फिफा वर्ल्ड कपमध्ये उसळणार गर्दीचा महापूर; 15 कोटींपेक्षा अधिक तिकिटांची मागणी, आतापर्यंतच्या सर्व वर्ल्ड कप प्रेक्षकांची बेरीजही फिकी
फुटबॉल हा खेळ नाही, तो एक जागतिक वेडेपणा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पुढील वर्षी अमेरिका मेक्सिको आणि पॅनडामध्ये संयुक्तपणे होत असलेल्या फिफा वर्ल्ड कपला 15 कोटींपेक्षा अधिक तिकिटांची मागणी झाल्याची माहिती खुद्द फिफाने दिली आहे. त्यामुळे यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये गर्दीचा महापूर उसळणार आणि आतापर्यंतचे तिकीट विक्रीचे, गर्दीचे सारे विक्रम मोडीत निघणार, हे निश्चित झाले आहे.
यंदा फिफा वर्ल्ड कपच्या तिकीट विक्रीला न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद लाभल्याचे फिफाने जाहीर केले. आत्तापर्यंत तब्बल 15 कोटींहून अधिक तिकीट अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे रॅण्डम सिलेक्शन ड्रॉचा सध्याचा टप्पा अजून अर्ध्यावर असतानाच हा विक्रम नोंदवला गेला आहे. म्हणजे सामना सुरू होण्याआधीच प्रेक्षकांनी मैदान जिंकून टाकलेय आणि सर्व सामने वर्ल्ड कपच्या पाच महिने आधीच सोल्ड आऊट होणार असल्याचे समोर आलेय.
३० पट ओव्हरसब्सक्रिप्शन
फिफाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक अर्जासोबत सबमिट केलेल्या व्हेरिफाइड व्रेडिट कार्ड्सच्या आधारे तब्बल 30 पट ओव्हरसब्सक्रिप्शन नोंदवण्यात आले आहे. आणखी एक धक्कादायक आकडा म्हणजे 1930 ते 2022 दरम्यान झालेल्या सर्व 22 वर्ल्ड कपमधील 964 सामन्यांतील एकूण प्रेक्षकसंख्येपेक्षा ही मागणी 3.4 पट अधिक आहे. म्हणजे जुन्या सगळय़ा वर्ल्ड कपचा इतिहास एकत्र केला तरी 2026 च्या तिकीट मागणीसमोर तो बेंचवर बसतो.
तीन देश१६ शहरे४८ संघ आणि 104 समोर
हा फुटबॉलचा पुंभमेळा 11 जून 2026 पासून सुरू होणार आहे. अमेरिका, पॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांतील 16 शहरांमध्ये सामने खेळवले जातील. यावेळी प्रथमच 48 संघ खेळणार असल्यामुळे 104 सामने आणि 39 दिवस हा थरार रंगणार आहे. 19 जुलैला फुटबॉलचा हा महायज्ञ पूर्ण होईल.
फुटबॉल इतिहासात नवा अध्याय
तिकिटांची ही विक्रमी मागणी आणि वाढलेला स्पर्धेचा विस्तार पाहता फिफा वर्ल्ड कप 2026 हा फक्त आकारानेच नव्हे, तर फॅन्सच्या सहभागाच्या बाबतीतही फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा आणि संस्मरणीय सोहळा ठरणार आहे. थोडक्यात हा वर्ल्ड कप खेळला जाण्याआधीच लिजंड ठरलाय.
200 पेक्षा अधिक देशांमधून तिकिटांची मागणी
11 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या तिकीट प्रक्रियेत 200 हून अधिक देश आणि प्रांतांमधून फुटबॉलप्रेमींनी फिफाच्या वेबसाईटवर धाव घेतली आहे. हा टप्पा 13 जानेवारी 2026 रोजी संपणार असला तरी आत्ताच तिकीट खिडकीबाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी लागल्यासारखी परिस्थिती आहे.
ही स्पर्धा नाही, हा महोत्सव
फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी या ऐतिहासिक प्रतिसादावर प्रतिक्रिया देताना म्हटले, फिफा वर्ल्ड कप 2026 हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक क्रीडा सोहळा ठरणार आहे. चाहत्यांचा हा प्रतिसाद म्हणजे फुटबॉलची जागतिक ताकद आहे. उत्तर अमेरिकेत आपण इतिहास घडवत आहोत जिथे एकता, आनंद आणि उत्कृष्ट फुटबॉलसाठी संपूर्ण जग एकत्र येणार असल्याची प्रतिक्रिया फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी दिली.
Comments are closed.