अनफिट तरीही आर्चर टी-20 वर्ल्ड कप संघात
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला अनफिट असूनही आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या हंगामी 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र याच वेळी पुढील महिन्यातील श्रीलंका दौऱयासाठी इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात आर्चरला खेळविले जाणार नाही. अॅडलेड येथे झालेल्या तिसऱया अॅशेस कसोटी सामन्यात डाव्या बाजूला झालेल्या दुखापतीनंतर तो मायदेशी परतला होता. सध्या तो इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली फिट होत आहे.
दरम्यान, जोश टंगला पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय संघात संधी देण्यात आली असून तो श्रीलंका दौऱयासाठी तसेच टी-20 विश्वचषक संघाचाही भाग आहे. ब्रायडन कार्स हा श्रीलंका दौऱयातील टी-20 संघात आहे, मात्र वर्ल्ड कपच्या तात्पुरत्या संघात त्याचा समावेश नाही.
2024 च्या विश्वचषक संघातील आठ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले असून, हॅरी ब्रूक (कर्णधार) आणि माजी कर्णधार जोस बटलर हे प्रमुख चेहरे आहेत. मोईन अली, जॉनी बेअरस्टो, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वुड यांना यावेळी वगळण्यात आले आहे. एकदिवसीय संघात झॅक क्रॉवलीचे डिसेंबर 2023 नंतर पुनरागमन झाले आहे.
Comments are closed.