मी भाजपसाठी रात्रंदिवस झटलो; भागवत कराडांनी त्यांच्या जातीच्या माणसाला अन् सावेंनी पीएला तिकीट

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भाजपने तिकीट कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले, काहींनी तीव्र संताप व्यक्त करत नेत्यांवर आरोप करत शिवीगाळही केली. एकीकडे दोन महिला उमेदवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे एका उमेदवाराने भाजप नेते अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाड्या अडवत त्यांच्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. कालपासून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीत डावलल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. प्रशांत भदाणे पाटील यांनी आज संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) भाजपच्या कार्यालयासमोर मंत्री अतुल सावे यांच्या गाडीसमोर मोठा राडा केला. इतरही अनेक उमेदवारांनी तिकीट नाकारल्याने सकाळापासूनच मंत्री अतूल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्यावर असंतोष व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना आता तिकीट वाटपात बाहेरचा रस्ता दाखवल्या जात असल्याचा आरोप पक्ष नेतृत्वावर करण्यात येत आहे. यावेळी पोलिस संरक्षणात सावे आणि कराड यांनी काढता पाय घेतला.(Chhatrapati Sambhajinagar)

नेत्यांच्या पीएला तिकीट, कार्यकर्त्यांवर अन्याय

प्रशांत भदाणे पाटील यांनी सर्व्हेची कागदपत्र दाखवत “मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला,” असा आरोप भदाने पाटील या संतप्त कार्यकर्त्याने केला. “मला अंधारात ठेवले गेले, आता जर मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच कराड यांनी जातीवर आणि सावे यांनी त्यांच्या पीएला नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

एकाने जातीचा दिला आणि एकाने पीएला तिकीट दिलं

प्रशांत भदाणे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, भाजप असा पक्ष आहे की, अन्याय करत नाही, म्हणून आम्ही २० वर्षांपासून काम करत आहोत. त्यांनी आमच्यावरती अन्याय केला आहे. मी २५ वर्षे भाजपचं काम केलं. तुला तिकीट देतो असं दुपारीपर्यंत सांगितलं, आणि सावेंच्या पीएला तिकीट दिलं. भागवत कराडांनी त्यांच्या जातीच्या माणसाला तिकीट दिलं. त्याला सर्व्हेत फक्त दोन टक्का सुध्दा नाही. तरी त्याला तिकीट दिलं, मी रात्रंदिवस झटलो, मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं, मी कचराकुंडीसुध्दा दिली. एकाने जातीचा दिला आणि एकाने पीएला दिलं. ही जनतेची पार्टी होती, आणि त्यांनी जनता सोडली आणि आता ही पार्टी प्रायव्हेड लिमीटेड करून टाकली. यांच्यात दम आहे तर सांगावं, सर्व्हे आणावा, मला त्यांनी अंधारात ठेवलं, मी इतका अन्याय सहन करू शकत नाही. हा सर्वे देवेंद्र फडणवीसांना पाठवा, मी सगळीकडे सर्व्हेमध्ये पुढे असून मला अंधारात ठेवलं, त्यांनी पीएला उमेदवारी दिली. सावेंना हे करून काय भेटलं असा सवालही प्रशांत भदाणे पाटील या संतप्त उमेदवारांनी केला आहे.

संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सर्वे दाखवत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अतुल सावेंना नेमकं काय भेटलं, त्यांनी त्यांच्या पीएला उमेदवारी दिली, त्यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे केलं, त्यांनी आत्ताच्या आत्ता सर्वे आणावा, जर त्यात माझं नाव नाही आलं तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेन, भागवत कराडांनी फक्त वंजाऱ्यांना तिकीट दिलं, असं म्हणत कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

सलग दुसऱ्या दिवशी हा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती

भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत संतप्त कार्यकर्त्यांनी गाडी आडवली, गाडीवरती काळं फासलं. यावेळी महिला कार्यकर्त्या देखील संतप्त झाल्याचं दिसून आलं. त्यांनी कार्यकर्त्यावरती अन्याय केला आहे. भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही. यावेळी त्याठिकाणी ठिकाणी दाखल झालेल्या अतुल सावे यांना देखील संतप्त कार्यकर्त्यांनी घेराव घातला. घटनास्थळी मोठा राडा झाल्याचं चित्र दिसून आलं. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. आमच्या घरी हे नेते येत होते, त्यासाठी आम्ही लाखो रूपये खर्च केले, आम्हाला उमेदवारी देऊ असं लॉलीपॉप दाखवलं, आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलं मात्र तिकीट दिलं नाही, यांच्या सर्व उमेदवार पडणार आहेत म्हणत संतप्त महिला कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्या घराघरात पोहोचलेला माणूस होता, त्याला तिकीट दिलेलं नाही, ज्याला कोणी ओळखत नाही, एक काम केलेलं नाही, त्याला यांनी तिकीट दिलेलं आहे. जो माणूस आमच्या कामाचा आहे, त्याचं खच्चीकरण केलं आहे. २० वर्षांपासून त्याला लुबाडलं, असं एका संतप्त महिला कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.