बुमराहच्या अव्वल स्थानाला मिचेल स्टार्कचं आव्हान, हॅरी ब्रूकमुळे स्मिथ आणि हेडचं मोठं नुकसान!
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आता भारताच्या जसप्रीत बुमराहच्या (jasprit Bumrah) आणखी जवळ पोहोचला आहे. मेलबर्न कसोटीतील दमदार कामगिरीमुळे स्टार्कने एका स्थानाची झेप घेत दुसरे स्थान गाठले आहे.
बुमराह आणि स्टार्क यांच्यात आता फक्त 36 रेटिंग पॉइंट्सचा फरक उरला आहे. स्टार्कला ॲशेस मालिकेतील शेवटच्या सामन्यात अव्वल स्थानी येण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कॉट बोलंड सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या गस ॲटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांनीही रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने (Harry Brook) फलंदाजीच्या क्रमवारीत मोठी मजल मारली असून तो आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. जो रूटचे पहिले स्थान कायम असले तरी, ब्रूक आणि त्याच्यामध्ये आता केवळ 21 पॉइंट्सचे अंतर आहे. हॅरी ब्रूकच्या प्रगतीमुळे केन विल्यमसन (तिसऱ्या क्रमांकावर), ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.
ॲशेस मालिकेतील मेलबर्न येथील ‘बॉक्सिंग-डे’ कसोटी सामना अत्यंत थरारक झाला. हा सामना अवघ्या दोन दिवसांत संपला असून यात एकूण 36 विकेट्स पडल्या. इंग्लंडने हा सामना 4 गडी राखून जिंकला.
Comments are closed.