नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटनाची भरभराट, गणपतीपुळे समुद्रकिनारी उसळली गर्दी

वर्षभरातील सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा देत 2025 वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची कोकण किनारपट्टीवर मोठी गर्दी झाली. कोकणातील अनेक समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले असून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर तर विशेषतः प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

थर्टी-फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील स्वच्छ आणि देखण्या समुद्रकिनाऱ्यांना मोठी पसंती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, मालगुंड, हर्णे, मुरूड, वेळणेश्वर, भाट्ये आणि मांडवी या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी वर्दळ दिसून आली. जिल्ह्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स हाऊसफुल्ल झाली असून पर्यटकांसाठी विशेष पॅकेजेसही उपलब्ध करून देण्यात आली. अनेक ठिकाणी मटण-चिकन, वडे, ताजे मासे अशा कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणाऱ्यांचीही मोठी रेलचेल होती. काही ठिकाणी नववर्षानिमित्त खास पार्ट्याही आयोजित करण्यात आल्या.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने नाकाबंदी करण्यात आली होती, तसेच साध्या वेशातील पोलीस आणि महिला पोलीस पथके संभाव्य गोंधळ आणि हुल्लडबाजीवर सतत लक्ष ठेवून होती.

Comments are closed.