हर्षा भोगलेंनी निवडली 2025ची वनडे टीम ; रोहित-विराट संघात, बुमराहला डच्चू
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी 2025 साठी आपली सर्वोत्कृष्ट एकदिवसीय (ODI XI) टीम जाहीर केली आहे. ही टीम निवडताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वाढत्या फ्रेंचायझी क्रिकेटमुळे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंच्या अनियमित सहभागामुळे त्यांनी टी-20 संघ निवडण्याचे टाळले. त्यामुळे त्यांनी पारंपरिक आणि संतुलित असा वनडे फॉरमॅटला प्राधान्य दिले. मात्र, 2025 मध्ये एकदिवसीय सामने कमी झाल्यामुळे योग्य संघ निवडणे आव्हानात्मक होते, असेही त्यांनी नमूद केले.
सलामीवीर म्हणून हर्षा भोगले यांनी रोहित शर्मा आणि शाई होप यांची निवड केली आहे. रोहित शर्माने 2025 मध्ये 50 च्या सरासरीने आणि 100 च्या स्ट्राइक रेटने 650 धावा केल्या असून तो भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा शाई होपला विकेटकीपर-फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. मोहम्मद रिझवानपेक्षा वरचढ ठरवत, होपने 56 च्या सरासरीने 670 धावा केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर कोणताही विचार न करता विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. विराटने 2025 मध्ये 65 च्या सरासरीने 651 धावा करत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटला संधी देण्यात आली आहे. रूट हा 2025 मध्ये संपूर्ण जगात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून त्याने 15 सामन्यांत 808 धावा केल्या आहेत.
मधल्या फळीत दक्षिण आफ्रिकेचा मॅथ्यू ब्रीट्झके (64) आणि न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल (761 धावा, 54 सरासरी) यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांनी संघाला स्थिरता आणि आक्रमकता दिली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून मिचेल सॅन्टनरची सातव्या क्रमांकावर निवड करण्यात आली असून त्याने 17 सामन्यांत 25 विकेट्स घेतल्या आहेत.
गोलंदाजी विभागात भोगले यांनी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांवर भर दिला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून मॅट हेनरी (31 विकेट्स), जोफ्रा आर्चर (18 विकेट्स) आणि जेडन सील्स (27 विकेट्स) यांची निवड झाली आहे. स्पिन विभागात कुलदीप यादवला स्थान देण्यात आले असून त्याने 11 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या आहेत.
शेवटी भोगले यांनी स्पष्ट केले की, ही टीम ‘मोठ्या नावांची’ नसून 2025 मधील सर्वोत्तम कामगिरीवर आधारित आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या स्टार खेळाडूंना पुरेसा सहभाग नसल्यामुळे संघात स्थान मिळाले नाही.
हर्ष भोगले यांची प्लेइंग 11 – रोहित शर्मा, शाई होप (यष्टीरक्षक), विराट कोहली, जो रूट, मॅथ्यू ब्रिट्झके, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, जोफ्रा आर्चर, जेडेन सील्स, कुलदीप यादव.
Comments are closed.