टीम इंडियात पुनरागमनानंतर या खेळाडूचे नशीब चमकले; विजय हजारेत विजयाचा चौकार
स्टार फलंदाज रिंकू सिंगचे नुकतीच टीम इंडियात दमदार पुनरागमन झाले असून, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसह टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. संघात परतल्यानंतर रिंकू सिंग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याची झलक विजय हजारे ट्रॉफीमध्येही पाहायला मिळत आहे. फलंदाजीसोबतच कर्णधार म्हणूनही रिंकूचे नेतृत्व कौशल्य प्रभावी ठरत आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा 20 डिसेंबर रोजी झाली, तर विजय हजारे ट्रॉफीचा शुभारंभ 24 डिसेंबरपासून झाला. या स्पर्धेत रिंकू सिंगने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांच्या 4 डावांत 136 च्या सरासरीने 273 धावा केल्या आहेत. या शानदार कामगिरीत एक शतक आणि दोन अर्धशतके यांचा समावेश आहे.
26 डिसेंबर रोजी चंदीगडविरुद्ध रिंकूने नाबाद 106 धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याआधी 24 डिसेंबरला हैदराबादविरुद्ध त्याने 67 धावा केल्या. बडोदा संघाविरुद्ध 67 चेंडूत 63 धावा, तर आसामविरुद्ध अवघ्या 15 चेंडूत नाबाद 37 धावांची झंझावाती खेळी त्याने साकारली.
रिंकू सिंग सध्या उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वाखाली यूपी संघाने विजयाची मालिकाच रचली आहे. या मोसमात यूपी संघाने सलग चारही सामने जिंकले आहेत. हैदराबादला 84 धावांनी, चंदीगडला तब्बल 227 धावांनी, बडोदाला 54 धावांनी आणि आसामला 58 धावांनी पराभूत करत यूपीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. उर्वरित स्पर्धेतही हीच लय कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
आगामी वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने रिंकू सिंगचा फॉर्म टीम इंडियासाठी दिलासादायक मानला जात आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिंकूने आतापर्यंत 35 सामने खेळून 550 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 160 पेक्षा अधिक असून, नाबाद 69 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. क्रमांक 5 किंवा त्याखाली खेळत फिनिशरची भूमिका निभावण्यात रिंकू सिंग तरबेज आहे आणि पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते.
Comments are closed.