नव्या वर्षाआधी विराट कोहलीची खास पोस्ट; अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकताच सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला असून, हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबतचा हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकत्र दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील खास टॅटूने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोमध्ये विराटच्या चेहऱ्यावर स्पायडरमॅनचा मास्क दिसत आहे, तर अनुष्काच्या चेहऱ्यावर तितलीचा टॅटू आहे. या अनोख्या लूकमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. काही चाहत्यांनी हा लूक मजेशीर असल्याचे म्हटले, तर काहींनी असा अंदाज व्यक्त केला की, विराट-अनुष्का आपल्या मुलांसोबत पार्टी करत असावेत, म्हणूनच असा टॅटू लूक निवडला असावा.

हा फोटो शेअर करताना विराट कोहलीने एक रोमँटिक कॅप्शनही लिहिले आहे. विराटने लिहिले, “मी माझ्या आयुष्याच्या प्रकाशासोबत 2026 या नव्या वर्षात प्रवेश करत आहे.” विराटच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या असून, नववर्षासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, मैदानावरही विराट कोहलीची चर्चा सुरूच आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराटने दमदार पुनरागमन केले असून, तब्बल 15 वर्षांनंतर तो लिस्ट-ए स्पर्धेत खेळताना दिसला. आता 6 जानेवारी रोजी बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रेल्वेजविरुद्ध दिल्लीकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विराटचा सध्याचा फॉर्मही तितकाच जबरदस्त आहे. पहिल्याच सामन्यात त्याने 131 धावांची शानदार खेळी साकारली, तर पुढील डावात 77 धावा केल्या. या दरम्यान विराटने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला असून, सर्वात जलद 16 हजार धावा करणारा खेळाडू बनण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. या विक्रमात त्याने सचिन तेंडुलकर यांनाही मागे टाकले आहे.

वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले, तर विराट आणि अनुष्काचे डिसेंबर 2017 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांच्या आयुष्यात कन्या वामिका हिचा जन्म झाला, तर 2024 मध्ये अनुष्काने मुलगा अकायला जन्म दिला. यामुळे विराट-अनुष्काचे कुटुंब पूर्ण झाले असून, हे सेलिब्रिटी कपल सध्या आयुष्याच्या नव्या टप्प्याचा आनंद घेत आहे.

Comments are closed.