मुंबईचा विजय महोत्सव सुरूच; कर्नाटकसह एमपी, यूपी आणि बिहारचाही विजयी चौकार
सरफराझ खानच्या 14 षटकार आणि 9 चौकारांच्या झंझावाती खेळीने मुंबईला 444 धावांचा डोंगरच उभारून दिला नाही तर विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईचा विजय महोत्सवही कायम ठेवला. विक्रमी धावांच्या या सामन्यात गोव्याला अभिनव तेजराणाच्या 70 चेंडूंतील 100 धावांच्या फटकेबाजीमुळे 9 बाद 357 धावांपर्यंत मजल मारता आली आणि मुंबईने 87 धावांनी विजयी चौकार ठोकत गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. त्याचप्रमाणे ‘अ’ गटात मध्य प्रदेश आणि कर्नाटक, ‘ब’ गटात उत्तर प्रदेश आणि प्लेट गटात बिहारने अपराजित राहत आपल्या विजयाचा चौकार ठोकला. 38 संघांच्या या स्पर्धेत आता केवळ चारच संघ अपराजित आहेत.
एमपी, यूपी, कर्नाटक अपराजित
देवदत्त पडिक्कलने मयंक अगरवालच्या साथीने 228 धावांची सलामी देत कर्नाटकच्या मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. मयंकने 132 तर देवदत्तने 113 धावांची शतकी खेळी साकारली. करुण नायरने 34 चेंडूंत 62 धावा फटकावत कर्नाटकला 4 बाद 363 अशी मजल मारून दिली. पुद्दुचेरीने या धावांचा जोरदार पाठलाग केला, पण ते 296 धावांपर्यंत पोहोचू शकले. उत्तर प्रदेशने आर्यन जुयालच्या 150 धावांच्या जोरावर आसामच्या 309 धावांचा जबरदस्त पाठलाग केला. 42 षटकांत 2 बाद 291 अशा विजयाच्या ट्रकवर असताना अंधुक प्रकाशामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही आणि डकवर्थ–लुईस नियमानुसार उत्तर प्रदेशने 58 धावांनी विजयी ठरला. आसामकडून सुमित घाडीगावकरने 101 धावा केल्या होत्या. तसेच मध्य प्रदेशने त्रिपुराचे 287 धावांचे आव्हान 6 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज गाठले. एमपीच्या विजयात यश दुबेच्या 105 धावा निर्णायक ठरल्या. बिहारने आपला झंझावात कायम राखताना नागालॅण्डचा 8 विकेटनी पराभव केला.
जम्मू-कश्मीरचा 63 धावांत खुर्दा
मोहम्मद शमी, आकाश दीप आणि मुकेश कुमार यांनी भेदक मारा करत जम्मू–कश्मीरचा डाव 20.4 षटकांत 63 धावांतच गुंडाळला. शमीने 2 तर आकाश दीप आणि मुकेश कुमारने प्रत्येकी चार-चार विकेट टिपले.
त्यानंतर बंगालने दहाव्या षटकांत विजयी लक्ष्य गाठत सामना उपाहाराच्या आधीच संपवला. दुसरीकडे केरळने राजस्थानच्या 344 धावांच्या आव्हानाचा संघर्षपूर्ण सामन्यात शेवटच्या चेंडूवर यशस्वी पाठलाग केला.
राजस्थानसाठी करण लांबाने नाबाद 119 धावा केल्या तर बाबा अपराजितने 126 धावांची खेळी केली. शेवटच्या क्षणी इडन अॅपलने 5 षटकारांची बरसात करत 18 चेंडूंत 40 धावा ठोकल्या आणि केरळला थरारक विजय मिळवून दिला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या दिल्लीला ओडिशाकडून 79 धावांनी हार सहन करावी लागली. ओडिशाने 8 बाद 272 धावा केल्या होत्या तर दिल्लीचा पूर्ण संघ 193 धावांतच आटोपला.
मुंबईच्या वादळात सरफराझची डरकाळी
गेले 14 महिने हिंदुस्थानी संघाबाहेर असलेल्या सरफराझने गोव्याच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवत निवड समितीला आपल्या बॅटची आणि फटक्यांची ताकद दाखवली. मुंबई संघात परतलेल्या यशस्वी जैसवालने 64 चेंडूंत केवळ 46 धावा काढल्या तेथे सरफराजने 56 चेंडूंत शतक ठोकत रोहित शर्माचा मुंबईसाठी केलेल्या वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला. रोहितने गेल्याच आठवडय़ात 62 चेंडूंत शतक साजरे केले होते. मुंबईला आज खान बंधूंनीच वेगवान केले. आघाडीच्या जोडीने 20 षटकांत केवळ 101 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर 30 षटकांत सरफराझच्या घणाघातामुळे 344 धावा चोपून काढल्या. सरफराझने आपला धाकटा भाऊ मुशीर खानच्या साथीने दहा षटकांत 93 धावांची भागी रचली. मुशीरने 66 चेंडूंत 60 धावा केल्या.
मुंबईने शेवटच्या 20 षटकांत 240 धावा ठोकल्या. सरफराझने या 20 षटकांत सिद्धेश लाडसह 45, शार्दुल ठाकूरबरोबर 42 आणि हार्दिक तामोरेसह 59 धावांची झंझावाती भागी रचत आपल्या 75 धावांच्या खेळीत 157 धावा फटकावल्या. तो बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनीही गोवन गोलंदाजांना फोडून काढत 8 षटकांत 100 धावा वसूल केल्या. त्यानंतर 445 धावांचा पाठलाग करणारा गोवा कधीच विजयाच्या आसपास दिसला नाही. अभिनव तेजराणाने (100), ललित यादव (64) आणि दीपराज गावकर (70) यांनी दमदार खेळ केला असला तरी त्यांचा पराभव निश्चित होता. या तिघांच्या अर्धशतकामुळे गोव्याने 50 षटके फलंदाजी करत साडेतीनशेचा टप्पा गाठला.
Comments are closed.