Google Doodle :नववर्षाच्या स्वागतासाठी गुगलचा खास डूडल, पार्टी थीममधून 2026 चे आगमन

नवीन वर्ष 2026 ची सुरुवात अधिक खास करण्यासाठी गुगलने आपल्या होमपेजवर विशेष ‘Google Doodle’ सादर केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलने डूडलच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांसोबत नववर्षाचा आनंद साजरा केला आहे. पार्टी थीमवर आधारित या डूडलमुळे गुगलचे होमपेज मध्यरात्रीच्या उत्सवाच्या रंगात रंगले आहे. (google doodle new year 2026 party theme)

नवीन वर्ष 2026 साठी तयार करण्यात आलेल्या या डूडलमध्ये गुगलचा लोगो पूर्णपणे बदललेल्या रूपात पाहायला मिळतो. चमकदार सोनेरी अक्षरांत ‘Google’ दाखवण्यात आले असून, मध्यभागी 2025 हा आकडा चांदीच्या फुग्यांच्या स्वरूपात दिसतो. माऊस फिरवल्यानंतर हा आकडा 2026 मध्ये बदलतो आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक ठरतो. लोगोच्या भोवती रंगीबेरंगी फुगे, पार्टी पॉपर्स, तारे आणि कॉन्फेटी दाखवण्यात आले असून संपूर्ण डिझाइन उत्सवाचा जल्लोष दर्शवते

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, हा डूडल जगभरात साजऱ्या होणाऱ्या नववर्षाच्या उत्सवाचे प्रतीक आहे. कोट्यवधी लोक या काळात जुने वर्ष निरोप देतात आणि नव्या आशा, अपेक्षा आणि संकल्पांसह पुढील वर्षाचे स्वागत करतात. मध्यरात्री बारा वाजताच नव्या वर्षाची अधिकृत सुरुवात होते, हीच भावना या डूडलच्या अ‍ॅनिमेशनमध्ये दाखवण्यात आली आहे.

कधी झाली गुगल डुडलची सुरुवात?
गुगल डूडलची सुरुवात 1998 साली झाली होती. त्यावेळी गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन बर्निंग मॅन फेस्टिव्हलला गेले असल्याची माहिती देण्यासाठी पहिला डूडल तयार करण्यात आला होता. त्यानंतरच्या अडीच दशकांत गुगलने पाच हजारांहून अधिक डूडल सादर केले आहेत. काळानुसार डूडलमध्ये अ‍ॅनिमेशन, व्हिडिओ, इंटरएक्टिव गेम्स, व्हर्च्युअल रिऍलिटी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत गेला आहे.

2025 या वर्षातही गुगल डूडलने अनेक जागतिक आणि सांस्कृतिक घटनांना वेगळ्या पद्धतीने सादर केले होते. विविध इंटरएक्टिव गेम्स, आंतरराष्ट्रीय सण, विशेष दिन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रम डूडलच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यात आले. वर्षाच्या अखेरीस ‘इयर इन सर्च’ व्हिडिओद्वारे जगभरातील प्रमुख शोध प्रवाह दाखवण्यात आले, ज्यातून डिजिटल जगातील वर्षाचा आढावा घेण्यात आला. नवीन वर्ष 2026 च्या निमित्ताने सादर करण्यात आलेले हे डूडल सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments are closed.