शहा यांनी नाराज दिलीप घोष यांच्याशी चर्चा केली.

बंगाल भाजपमधील गटबाजी दूर करणार

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला आता काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. अशास्थितीत भाजप सक्रीय झाला आहे. बहुतांश मोठ्या राज्यांमध्ये निवडणूक विषयक पक्षाची धुरा सांभाळणारे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: बंगालमध्ये लक्ष घातले आहे. अमित शाह यांनी कोलकात्यात सर्व भाजप नेत्यांसोबत बुधवारी बैठक घेतली आहे. यात राज्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी, प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य सहभागी झाले. या बैठकीत दिलीप घोष यांची उपस्थिती सर्वांना चकित करणारी ठरली.

अमित शाह यांनी स्वत: घोष यांची भेट घेत त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. घोष हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा मागील काही काळापासून होत असल्याने त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. घोष हे यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसून आले होते. घोष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचाही कयास वर्तविला जात होता. परंतु आता गोष्टी बदलल्या आहेत. दिलीप घोष यांना आगामी विधानसभा निवडणुकीकरता महत्त्वाची भूमिका देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

संबंधित बैठकीत बंगालमधील पक्षाचे सर्व खासदार, आमदारांना बोलाविण्यात आले होते. याचबरोबर स्थानिक नेतेही यात सहभागी झाले. संघटनेच्या काही प्रभावशाली लोकांनाही बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत दिलीप घोष उपस्थित राहिल्याने दीर्घकाळापासून त्यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. घोष यांना बंगाल भाजपच्या सर्वात यशस्वी प्रदेशाध्यक्षांपैकी एक मानले जाते. त्यांच्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात 2019 मध्ये भाजपने 18 खासदार राज्यातून निवडून आणले होते. तर 2014 मध्ये ही संख्या केवळ 3 च होती. मग 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या 70 पर्यंत पोहोचली होती. अशास्थितीत त्यांच्या उपस्थितीला एक संकेत म्हणून पाहिले जात आहे. भाजपमध्ये एकजूटता निर्माण करत मोठ्या नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्याचे स्पष्ट संकेत अमित शाह यांनी दिले आहेत.

Comments are closed.