ब्रॅडमन यांची बॅगी ग्रीन पहिल्यांदाच लिलावात

ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वात सर्वात पवित्र समजली जाणारी ‘बॅगी ग्रीन’ टेस्ट कॅप आता थेट लिलावाच्या मंचावर येत आहे. क्रिकेटच्या देव्हाऱयात अढळ स्थान मिळवणारे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची ऐतिहासिक ऑस्ट्रेलियन ‘बॅगी ग्रीन’टेस्ट कॅप पहिल्यांदाच लिलावात जात असून ती मिळवण्यासाठी जगभरातील संग्राहक आणि क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
1947-48 मधील हिंदुस्थान–ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेशी संबंधित ही कॅप तब्बल 75 वर्षे एकाच कुटुंबाकडे सुरक्षित राहिली होती. ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’च्या वृत्तानुसार, ही बॅगी ग्रीन कॅप लॉयड ऑक्शन्सकडून नव्या वर्षात लिलावासाठी ठेवली जाणार आहे. लिलावाची बोली केवळ एक डॉलरपासून सुरू होणार असून 26 जानेवारी 2026 रोजी ही प्रक्रिया संपणार आहे. विशेष बाब म्हणजे, ही कॅप ब्रॅडमन यांनी स्वतः एका सहकारी कसोटीपटूला भेट म्हणून दिली होती. तेव्हापासून गेल्या सात दशकांहून अधिक काळ ती त्या क्रिकेटपटूच्या कुटुंबात जपली गेली. आजवर ना ती कधी विक्रीस ठेवण्यात आली, ना सार्वजनिक प्रदर्शनासाठी मांडण्यात आली.
ही क्रिकेट इतिहासातील एक अस्सल आणि दुर्मिळ ठेवा आहे. थेट सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याशी जोडलेली आणि 75 वर्षे एका कुटुंबात सुरक्षित राहिलेली ही कॅप अत्यंत खास असल्याचे मत लॉयड ऑक्शन्सचे ली हॅम्स यांनी व्यक्त केले. हीच ती कॅप आहे, जी ब्रॅडमन यांनी 1947-48 च्या हिंदुस्थान दौऱ्यात परिधान केली होती. त्या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी सहा डावांत 715 धावा ठोकल्या होत्य. हिंदुस्थानी क्रिकेटच्या प्रारंभीच्या आंतरराष्ट्रीय पर्वातील हा सुवर्णअध्याय मानला जातो.
आतापर्यंत सर्वात महागडी बॅगी ग्रीन कॅप दिवंगत शेन वॉर्नच्या नावावर आहे. त्याच्या कसोटी कॅपसाठी 2019-20 मध्ये ऑस्ट्रेलियन बुशफायर मदतीसाठी 10,07,500 डॉलर्स मोजण्यात आले होते, मात्र ब्रॅडमन यांची ही कॅप इतिहास, वारसा आणि महानतेच्या निकषांवर अजूनही एक वेगळय़ाच उंचीवर उभी आहे. त्यामुळे नव्या वर्षात होणारा हा बॅगी ग्रीनचा लिलाव हा केवळ एका कॅपचा लिलाव नसेल, तो क्रिकेटच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार पुन्हा एकदा जगासमोर येण्याचा क्षण असेल.

Comments are closed.