निवडणुकीचे नवीन वर्ष… निवडणुकीच्या 7 वेगवेगळ्या शक्यता

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटकासाठी 2026 हे वर्ष राजकीय दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण नव्या वर्षात 7 विविध निवडणुका होणार आहेत. बेंगळूरमध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या पाच नगरपालिकांसह ग्रामपंचायतींसाठी यंदा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यंदाचे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कर्नाटकात 2023 मध्ये विधानसभेची, 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. 2025 मध्ये कोणत्याही मोठ्या निवडणुका झाल्या नाहीत. मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण निश्चितीला विलंब झाल्यामुळे 2025 मध्ये राज्यात जिल्हा आणि तालुका पंचायतींसाठी निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे निवडणुकीसाठी चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहणाऱ्यांची निराशा झाली होती. मात्र, 2026 मध्ये जिल्हा व तालुका पंचायती, 185 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींसाठी एकापाठोपाठ निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 239 तालुका पंचायतींच्या 3,671 मतदारसंघ आणि 31 जिल्ह्यातील 1,130 मतदारसंघांमध्ये 2020-21 निवडणुका झालेल्या नाहीत. जिल्हा व तालुका पंचायतींच्या मतदारसंघ पुनर्रचना अंतिम केली आहे. मात्र, आरक्षण निश्चित करून निवडणूक आयोगाकडे सादर केलेली नाही. हा मुद्दा न्यायालयात आहे. एप्रिल 2026 मध्ये येथील निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील मंगळूर, शिमोगा, दावणगेरे, तुमकूर आणि म्हैसूर महानगरपालिकांसाठी मतदारयादी अंतिम झाली असून सरकारने आरक्षण यादी जाहीर केल्यास त्यानुसार अन्यथा जुन्या आरक्षण यादीनुसार यंदाच निवडणुका घेतल्या जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे कार्यकाळ संपत आलेल्या 185 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही नव्या वर्षात निवडणुका होतील. आमदार एच. वाय. मेटी यांच्या निधनामुळे बागलकोट मतदारसंघात आणि शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे दावणगेरे दक्षिण मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

राज्यातील 6,022 ग्रामपंचायतींपैकी अनेक पंचायतींचा कार्यकाळ जानेवारी व फेब्रुवारीत संपणार आहे. त्यामुळे येथेही यंदा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सरकारने बेंगळूर महानगरपालिका रद्द करून ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण स्थापन करून पाच नगरपालिकांची रचना केली आहे. त्यामुळे पाच नगरपालिकांसाठीही निवडणूक होणार आहेत.

2026 मध्ये होणाऱ्या संभाव्य निवडणुका

239 तालुक्यातील 3,671 मतदारसंघांमध्ये तालुका पंचायत निवडणूक, 31 जिल्ह्यांतील 1,130 मतदारसंघांमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक, ग्रामपंचायतींमधील 6 हजारहून अधिक वॉर्ड, नगरपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिकांमधील 185 वॉर्ड, ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणांतर्गत 5 नगरपालिकांमधील 369 वॉर्ड, 5 महानगरपालिकांसाठी निवडणूक तसेच दोन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होणार आहे.

Comments are closed.