राजस्थानमध्ये अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.
डीएसटीची मोठी कारवाई : दोन जणांना अटक
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानात डीएसटी टीमने मोठी कारवाई करत विस्फोटक सामग्रीच्या अवैध पुरवठ्याचा भांडाफोड केला आहे. टीमने एका कारमधून मोठ्या प्रमाणात विस्फोटक सामग्री हस्तगत केली असून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारी कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपी यूरिया खताच्या पिशव्यांमध्ये लपवून सुमारे 150 किलो अमोनियम नायट्रेड नेत होते. ही विस्फोटक सामग्री बूंदी येथून टोंक येथे नेण्यात येत होती. डीएसटी टीमला यासंबंधी खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती, ज्याच्या आधारावर बरौनी येथे कारवाई करण्यात आली आहे.
कारच्या झडतीदरम्यान पोलिसांनी अमोनियम नायट्रेटसोबत 200 धोकादायक एक्सप्लोसिव्ह कार्टेज तसेच सेफ्टी फ्यूज वायर्सची 6 बंडले हस्तगत केली आहेत. प्रत्येक बंडलात सुमारे 183 मीटर लांब वायर होती. डीएसटी टीमने याप्रकरणी भंवर लाल पटवा आणि दुलीलाल यांना अटक केली आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत असून विस्फोटक सामग्रीच्या पुरवठ्याशी निगडित नेटवर्कचा तपास केला जात आहे. ही विस्फोटक सामग्री खाणकामादरम्यान स्फोट घडविण्यासाठी वापरली जात असण्याची शक्यता आहे. टोंकनजीक मोठ्या संख्येत दगडांच्या खाणी आहेत. यापूर्वी अमोनियम नायट्रेटचा पुरवठा कुठे-कुठे करण्यात आला होता याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसेच तो कुठून आणला जात होता हे देखील शोधले जाणार आहे. याप्रकरणी लवकरच महत्त्वाचे खुलासे होण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed.