टी20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; पॅट कमिन्स नव्हे, तर या खेळाडूकडे कर्णधारपद

आयसीसी टी20 विश्वचषक 2026 साठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केली असून मिचेल मार्शकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधत ऑस्ट्रेलियाने एक अत्यंत मजबूत संघ निवडल्याचे स्पष्ट दिसते.

या संघात तीन खेळाडू प्रथमच ऑस्ट्रेलियासाठी टी20 विश्वचषकात पदार्पण करणार आहेत. फिरकीपटू मॅथ्यू कुह्नमैन, अष्टपैलू कूपर कोनली आणि वेगवान गोलंदाज जेवियर बार्टलेट यांना पहिल्यांदाच विश्वचषक संघात संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे हे तिघेही सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून मोठ्या स्पर्धेत आपली छाप पाडण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

फलंदाजी आणि अष्टपैलूपणाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अतिशय भक्कम आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरन ग्रीन यांसारखे धडाकेबाज अष्टपैलू कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता बाळगतात. त्यांच्यासोबत ट्रॅव्हिस हेड, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट आणि जोश इंग्लिस यांसारखे आक्रमक फलंदाज संघाला अतिरिक्त बळ देतात.

गोलंदाजी विभागातही ऑस्ट्रेलियाकडे अनुभवाची कमतरता नाही. पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड हे अनुभवी वेगवान गोलंदाज संघाचे प्रमुख अस्त्र ठरणार आहेत. नाथन एलिसही डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी ठरू शकतो. तर फिरकीत अ‍ॅडम झम्पा आणि मॅथ्यू कुह्नमैन भारतीय खेळपट्ट्यांवर विरोधी संघांसाठी मोठे आव्हान ठरतील. मार्कस स्टोइनिसचा मध्यमगती पर्यायही संघासाठी उपयुक्त ठरणार आहे.

टी20 विश्वचषक 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश गट ‘ब’ मध्ये करण्यात आला आहे. या गटात ऑस्ट्रेलियासह श्रीलंका, झिम्बाब्वे, ओमान आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 11 फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध, 16 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध आणि शेवटचा साखळी सामना 20 फेब्रुवारीला ओमानविरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

एकूण 20 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चार गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर बाद फेरीचे सामने रंगतील.

टी20 विश्वचषक 2026 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ:

मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, कूपर कॉनेली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुन्हमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झांपा.

Comments are closed.