पडद्याआडून – असेन मी नसेन मी, अस्तित्व, स्मृती आणि नात्यांचा शोध!
>> पराग खोत
मराठी रंगभूमीवरचा कौटुंबिक अवकाश अनेकदा ओळखीचा, सुरक्षित आणि अनुमानित वाटतो, मात्र ‘असेन मी नसेन मी’ हे नाटक या परिचित चौकटीतूनच आपल्याला अस्तित्व, स्मृती आणि नात्यांच्या नाजूक सीमारेषांवर नेऊन उभे करते. अभिनयात स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण केलेल्या, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अमृता सुभाषने दिग्दर्शक म्हणून केलेले हे पदार्पण आशयाच्या प्रगल्भतेमुळे विशेष लक्ष वेधून घेते.
हे नाटक मोठय़ा घटना, भव्य वळणे किंवा नाटय़मय धक्क्यांवर उभे नाही. ते उभे आहे रोजच्या जगण्यात हळूच शिरणाऱया बदलांवर. विसरणे, दुरावणे, थकणे आणि तरीही निभावून नेणे यावर. दोन पिढय़ांतील तीन वेगळय़ा विचारांच्या स्त्रियांचे जग हे नाटक उलगडत जाते आणि त्या उलगडण्यातूनच मानवी असहायतेचे अनेक पदर उघड होतात.
आईच्या (नीना कुलकर्णी) विस्कळीत होत जाणाऱया आठवणी, मुलगी गौरीचे (अमृता सुभाष) आतून तुटत जाणे आणि मावशी वर्षाची (शुभांगी गोखले) मध्यस्थ, आधार देणारी उपस्थिती, या त्रिकोणातून नाटक पुढे सरकते. येथे कुणीही पूर्णपणे बरोबर किंवा चूक नाही. प्रत्येकजण आपापल्या मर्यादांमध्ये अडकलेला आहे. विशेषतः डिमेंशियाचा विषय नाटकात अतिशय संयतपणे हाताळला आहे. तो केवळ आजार न राहता, नात्यांवर होणारा परिणाम म्हणून समोर येतो.
संदेश कुलकर्णी यांचे संहितालेखन ही या नाटकाची खरी ताकद आहे. संवाद कृत्रिम वाटत नाहीत; ते आपल्याच घरात ऐकू येणाऱया वाक्यांसारखे वाटतात. काही प्रसंगांमध्ये संवादांची लांबी थोडी वाढते, मात्र ती वाढही पात्रांच्या आतल्या गोंधळाचीच साक्ष देते. नीना कुलकर्णी यांचा मृत पतीच्या स्मृतीभोवतीचा एक दृष्टिकोन आणि त्याचे दृश्य स्वरूप अनावश्यक वाटते, तरीही ते नाटकाच्या एकूण परिणामाला फारसा धक्का देत नाही.
अमृता सुभाषचे दिग्दर्शन अत्यंत सूक्ष्म आहे. ती कुठेही भावनांवर जबरदस्ती करत नाही. नाटक हळूहळू भावनिक उंची गाठते आणि प्रेक्षक त्या प्रवासात नकळत सामील होतो. विनोदाचे हलके क्षण आणि गंभीर वास्तव यांचा समतोल तिने चोख साधला आहे. या नाटकात रडारड आहे असा सूर काहींनी लावला होता, पण तसे नाही. संवेदनशील प्रेक्षकांच्या डोळय़ात अश्रू उभे करण्यापासून त्यांना वेळोवेळी हसवत ठेवण्यापर्यंतचा प्रवास हे नाटक सहजगत्या करतं. आपल्या सर्वांच्याच उतारवयातील प्रतिमा ठसठशीतपणे आपल्याला दाखवतं.
अभिनयाच्या बाबतीत नीना कुलकर्णी केंद्रस्थानी आहेत. विस्मरणाच्या गर्तेत अडकलेली स्त्री त्यांनी इतक्या सहजतेने उभी केली आहे की तिची अस्वस्थता प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचते. अमृता सुभाष गौरीच्या भूमिकेत प्रतिक्रिया, मौन आणि अंतर्मुखतेतून अधिक बोलतात. शुभांगी गोखले आपल्या भूमिकांना वेगळी छटा देत नाटकाला स्थैर्य देतात. त्यांच्या भूमिकेतील बदल हा आश्चर्याचा सुखद धक्का देणारा आहे.
संकेत कानेटकर यांचे संगीत प्रभावी आहे आणि प्रदीप मुळे यांच्या नेटक्या सेट डिझाइनमुळे घराचा अवकाश केवळ पार्श्वभूमी न राहता नाटकातील एक जिवंत घटक म्हणून वावरतो.
‘असेन मी नसेन मी’ हे नाटक पडदा पडल्यानंतरही संपत नाही तर ते मनात रेंगाळत राहते. आपल्या आईवडिलांकडे, आपल्या नात्यांकडे आणि सरतेशेवटी स्वतःच्या अस्तित्वाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. कुठलेही ढोल न बडवता, शांतपणे प्रश्न विचारणारे हे नाटक मराठी रंगभूमीच्या संवेदनशील प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल ठरते आहे.
लेखक – संदेश कुलकर्णी
दिग्दर्शक – अमृता सुभाष
कलाकार – नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले, अमृता सुभाष
नेपथ्य आणि प्रकाश – प्रदीप मुळ्ये
संगीत – संकेत कानेटकर
कॉस्च्युम डिझायनर – ः श्वेता बापट
सूत्रधार – दिगंबर प्रभू
निर्माता- स्क्रिप्टीज क्रिएशन्स आणि रंगाई
Comments are closed.