न्यूझीलंड मालिकेसाठी कधी जाहीर होणार संघ? शुबमन गिलची एन्ट्री निश्चित
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जानेवारी महिन्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या आठवड्यात संघाची घोषणा करू शकते. नियमित कर्णधार शुबमन गिल मानेला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून, तो पुन्हा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. साउथ आफ्रिकेविरुद्धच्या अलीकडील वनडे मालिकेत दुखापतीमुळे बाहेर असलेला गिल आता फिट झाला असून, त्याच्या पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र आता गिलची कर्णधार म्हणून पुनरागमन निश्चित मानले जात आहे. यामुळे सलामीवीर यशस्वी जायसवालला पुन्हा एकदा आपल्या संधीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. जायसवालने मागील सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली असली तरी संघ संयोजनात बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचा विचार करता काही प्रमुख खेळाडूंना या वनडे मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. टीओआयच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याला या मालिकेतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. हार्दिक सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याला टी20 मालिका आणि विश्वचषकासाठी पूर्णपणे ताजेतवाने ठेवण्यावर संघ व्यवस्थापनाचा भर आहे.
अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. दोघांनीही अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घेत चांगली फलंदाजी केली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
विकेटकीपिंगच्या बाबतीत रिषभ पंतची खराब फॉर्म आणि वनडेतील संघर्ष लक्षात घेता निवड समिती ईशान किशनला बॅकअप विकेटकीपर म्हणून संधी देऊ शकते. किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अलीकडेच दमदार कामगिरी केली आहे. तर श्रेयस अय्यरची फिटनेस अजूनही प्रश्नचिन्ह ठरली आहे. तो फिट न झाल्यास ऋतुराज गायकवाडला मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला वडोदरा येथे, दुसरा 14 जानेवारीला राजकोट येथे, तर तिसरा आणि अंतिम सामना 18 जानेवारीला इंदौर येथे खेळवला जाणार आहे. ही मालिका आगामी मोठ्या स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Comments are closed.