भारताचा अर्थव्यवस्थेत चौथा क्रमांक लागतो.
जपानला टाकले मागे, जर्मनीच्या पुढे जाणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जपानला मागे टाकून आता भारताने जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून मान मिळविला आहे. भारताने वर्षअखेरीस प्रसिद्ध केलेल्या आर्थिक आढावा अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. सध्याचा प्रगतीचा वेग लक्षात घेता 2030 पर्यंत भारत जर्मनीलाही मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आता 4 लाख 18 हजार कोटी डॉलर्सपर्यंत पोहचले आहे. भारतीय रुपयाचा डॉलरच्या तुलनेतील सध्याचा दर लक्षात घेता ही किंमत 3.5 कोटी कोटी रुपये इतकी होते. 2030 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार सध्याच्या विकासदरानुसार 7.3 लाख कोटी डॉलर्स इतका होणार आहे. त्यामुळे भारत जर्मनीच्या पुढे जाईल, असे भाकित अहवालात करण्यात आले आहे.
विकासदर समाधानकारक
सध्याच्या काळात भारताचा विकास दर समाधानकारक आहे. विद्यमान वित्तवर्षाच्या द्वितीय तिमाहीत भारताच्या विकासदराने 8.2 टक्क्याची पातळी गाठली आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांकही वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत विकासदर 7.8 टक्के होता. सध्याचा विकासदर गेल्या सहा तिमाहींपेक्षा अधिक आहे. वर्ष 2025 संपत असताना ही एक शुभवार्ता भारतासाठी आहे.
अनुमानामध्ये अंतर
भारताच्या म्हणण्यानुसार त्याने आत्ताच जपानला मागे टाकले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार भारत 2026 मध्ये जपानला मागे टाकणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.3 टक्के राहील, असे अनुमान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तिच्या अहवालात व्यक्त केले आहे.
देशातंर्गत मागणीमुळे प्रगती
अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लावला असूनही भारताचा विकास दर वाढत आहे. याला कारण भारतात सध्या देशांतर्गत मागणी जोरावर आहे. भारताने देशांतर्गत मागणी वाढेल, अशा प्रकारची धोरणे स्वीकारली आहेत. परिणामी, देशांतर्गत उत्पादनातही वाढ होत आहे. अशा प्रकारे केंद्र सरकारची धोरणे आणि देशातल्या उद्योग क्षेत्राचे प्रयत्न यांच्या संयोगाने विकासदर वाढल्याचे दिसत आहे. तथापि, भारताचे प्रतिमाणशी उत्पन्न जगातील कित्येक प्रगत देशांपेक्षा कमी आहे. सध्या ते केवळ 2,694 डॉलर्स प्रतिवर्ष इतकेच आहे. या उलट जपानचे प्रतिमाणशी वार्षिक उत्पन्न 32,487 डॉलर्स तर जर्मनीचे 56,103 डॉलर्स आहे.
Comments are closed.