उमेदवारांचा खर्च तपासताना येणार ‘नाकीनऊ’! खर्चावर प्रशासनाची करडी नजर

निवडणूक म्हटली की उमेदवारांकडून जेवणावळी आल्याच. उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा नऊ लाख रुपये आहे. तब्बल २८९ प्रकारचे खर्च दाखवायचे असल्याने ताळेबंद पाहणाऱ्याला ‘नाकीनऊ’ येतात. एक उमेदवार निवडणुकीत किती लोकांना जेवण देतो आणि किती थाळ्या दाखवतो, हा निवडणूक आयोगासाठी संशोधनाचा विषय ठरत आहे. मांसाहारी थाळीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली दरसूची ‘स्वस्तात मस्त’ अशीच आहे.

सध्या सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जेवण तसेच चहा-नाश्त्यासाठीची दरसूची परवडणारी ठेवली आहे. टपरीवरील चहा-कॉफी आणि ढाब्यावरील थाळीचे दर आयोगाने गृहीत धरले आहेत. शाकाहारी थाळीसाठी ७० रुपये, स्पेशल थाळीसाठी १२० रुपये, तर मांसाहारी थाळीमध्ये अंडाकरी १२०, चिकन १५०, मटण २०० आणि मच्छी २०० रुपये अशी दरसूची आहे. साधा चहा सात, तर स्पेशल चहा १५ रुपये आहे. कॉफीचाही दर तितकाच आहे. शिरा, पोहे, उपीट १५ रुपये, मिसळ ४० रुपये, पाण्याची बाटली २० रुपये, तर २०० मिली शीतपेय २० रुपये दराने निश्चित करण्यात आले आहे.

मंडप, टेबल, खुर्ची, पाणी

उमेदवाराच्या खर्चात मंडपासाठी आठ रुपये, लाकडी स्टेजसाठी प्रति चौरसफूट २० रुपये, शोभा कमान २,५०० रुपये, लोखंडी-लाकडी-प्लास्टिक खुर्ची सहा ते दहा रुपये, सोफासेट ५०० रुपये, व्हीआयपी खुर्ची १२५ रुपये, टेबल २५० रुपये, गादी ६० रुपये, लाईट लोड ४० रुपये, पाणी टँकर (प्रति दहा हजार लिटर) १,००० रुपये, पाणी जार २० रुपये, काचेचे ग्लास सहा रुपये, स्टील व प्लास्टिक ग्लास चार रुपये, फॅनसाठी २०० ते ३५० रुपये असे एकूण २८९ प्रकारच्या खर्चाचे दर निवडणूक यंत्रणेने निश्चित केले आहेत.

विशेष म्हणजे सध्या नारळाचे दर पंचवीस रुपयांपेक्षा अधिक आहेत. मात्र, निवडणूक यंत्रणेने प्रतिनारळ १५ रुपये अशी दरसूची ठरवली आहे. पुष्पगुच्छासाठी १०० ते ३०० रुपये, हारासाठी १०० ते २०० रुपये, फटाक्यांची माळ २५० ते ८०० रुपये, तर गुलाल ६० रुपये प्रतिकिलो अशीही दरसूची जाहीर करण्यात आली आहे.

अर्ज भरल्यापासून खर्चाचे मीटर सुरू

उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून त्यांच्या खर्चाचे मीटर सुरू झाले आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागते. तसेच नियमितपणे खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई करण्यात येणार आहे.

Comments are closed.