नववर्षाच्या पूर्वसंध्येला रशियातील तेल कारखान्यांवर युक्रेनचे ड्रोन हल्ले; दोन ठिकाणी भीषण आग

नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि १ जानेवारीच्या पहाटे युक्रेनकडून रशियातील तेलविषयक पायाभूत सुविधांवर सलग ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, कालूगा प्रांतातील ल्यूदिनोवो तेल साठवण केंद्र (ऑइल डेपो) आणि क्रास्नोडार क्रायमधील इल्स्की तेल शुद्धीकरण प्रकल्पावर (ऑइल रिफायनरी) हे हल्ले झाले असून, दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली आहे.

कालूगा प्रांतातील ल्यूदिनोवो तेल डेपोवर ३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या काउंटडाऊनच्या काही वेळ आधी ड्रोन हल्ला झाला. त्यानंतर १ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर क्रास्नोडार क्राय येथील इल्स्की तेल रिफायनरीवरही ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनांमध्ये आगीचे लोळ उठल्याचे व्हिडीओ आणि माहिती स्थानिक माध्यमे तसेच सार्वजनिक टेलिग्राम चॅनेलवरून समोर आली आहे.

या हल्ल्यांमुळे रशिया-युक्रेन युद्धात ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची रणनीती अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या घटनांमध्ये नेमके किती नुकसान झाले किंवा कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत रशियन प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल दाखल करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.