शनिशिंगणापुरात पूजासाहित्य दराचे फलक झळकले, हजारो रुपयांची पूजा मिळणार १५० ते ५०० रुपयांना

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची पूजासाहित्यात होत असलेल्या लुटीच्या पार्श्वभूमीवर शनी मंदिराचे प्रशासक तथा नाशिक उपविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंदिर कारभाराची सूत्रे हाती घेताच कायद्याचा बडगा उगारला. शनिवारी (दि. २७) गाळेधारकांबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी पूजासाहित्य दरांचे मोठे फलक लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंदिर परिसरात देवस्थान तसेच खासगी वाहनतळावरील दुकानांसमोर दरपत्रकाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यामुळे हजारो रुपयांना विकली जाणारी पूजा आता १५० ते ५०० रुपयांच्या दरात उपलब्ध झाल्याने भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात गेल्या अनेक वर्षांपासून पूजासाहित्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी येऊनही देवस्थान मंदिर व पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. वेळप्रसंगी भाविकांना मारहाण करण्यापर्यंत व्यावसायिकांची मजल गेली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत असल्या तरी कारवाई कागदावरच मर्यादित राहिली होती.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नाशिक विभागीय आयुक्तांची शनैश्वर देवस्थानच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (दि. २७) आयुक्तांनी स्वतः वेश बदलून मंदिर परिसरातील पूजासाहित्य विक्रीच्या दुकानांना भेटी दिल्या. पूजासाहित्यात मोठी लूट होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने गाळेधारक व दुकानमालकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कडक सूचना देत कमीत कमी दरात पूजासाहित्य विक्रीसाठी दरपत्रकाचे मोठे फ्लेक्स लावण्याचे आदेश दिले.

अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारताच मंदिर परिसरातील देवस्थान वाहनतळ व खासगी वाहनतळावरील सर्व दुकानदारांनी पूजासाहित्य दरांचे मोठे फलक उभारले आहेत. त्यावर पूजासाहित्याचे निश्चित दर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत.

पूजेचे दर – १५१ ते ५५१ रुपये

नारळ, रुईचा हार, काळे कापड, मुरमुरे प्रसाद, काळी बाहुली, भगवा धागा, फूल–अगरबत्ती, नवग्रह यंत्र, शनी यंत्र, शनी पादुका, घोड्याचा नाल, लोखंडी वस्तू, अंगठी, पेढ्याचा प्रसाद या वस्तू पूजासाहित्यात समाविष्ट आहेत.

तेलाचे दर – १०० ते ४,५०० रुपये

  • 200 मिली – 100 रु

  • 500 मिली – 200 रु

  • १ लिटर – ३०० रुपये

  • ५ लिटर – १,५०० रुपये

  • १५ लिटर – ४,५०० रुपये

Comments are closed.