जाचक अटींमुळे सावकारीचा पाश, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अडकली ई-केवायसीमध्ये

अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानभरपाईबाबत तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही मोखाडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना बँकेत ई-केवायसी नसल्याचे कारण देत पीक नुकसानीचे पैसे दिलेले नाहीत. सरकारच्या जाचक अटीत ही भरपाई अडकली आहे. त्यामुळे सावकारी व्याजाने पैसे घेऊन शेतकरी आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहेत.
खरीप हंगामात पुरामुळे शेती वाहून गेली. शिवाय करपा, बुरशी, बगळ्या रोगांच्या प्रादुर्भावाने पीक भुईसपाट झाले. बळीराजाला दिलासा देण्यासाठी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनाला आदेश दिले. महसूल, कृषी विभागाने पंचनामे करून शासनाला यादी दिली. काही दिवसांतच शासनाकडून रक्कमही मंजूर करण्यात आली. या नुकसानभरपाईत तालुक्यातील 1 हजार 441 शेतकरी पात्र ठरले.
मुळात नुकसानभरपाईत मोठा दुजाभाव असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या भरपाई रकमेमध्ये मोठी तफावत असल्याने खरा शेतकरी मात्र आपल्या हक्काच्या रकमेपासून वंचित आहे. शिवाय आधार कार्ड अपडेट, मोबाईल नंबर बँक, अकाऊंट लिंक, अर्ज करणे, सातबारावरील अनेक नावे अशा विविध कागदपत्रांमध्ये फेऱ्यात ही भरपाई अडकल्याने तुटपुंजी रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात मिळालेली नाही. अखेर नाईलाजास्तव परिवाराच्या पालन पोषणासाठी शेतकऱ्यांवर उसनवारी आणि कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
एक एकरवर लावलेले पीक गेले. तहसील यादीमध्ये माझ्या नावे दोन हजार आठशे रुपये मंजूर झाल्याचे दिसते. आधार अपडेट, बँक ईकेवायसी, मोबाईल नंबर या कागदपत्रांची पूर्तता करूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. आता वर्षभराच्या कुटुंब उदरविवाहासाठी सावकाराकडून कर्ज काढावे लागले आहे.
कोंडाजी ठोंबरे, शेतकरी (जोगलवाडी)

Comments are closed.