कोहली-रोहितची जादू! पहिल्या वनडेच्या तिकिटांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद, 8 मिनिटांतच सर्व तिकिटे बुक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला बडोदा येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. कोहली-रोहितच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे अवघ्या 8 मिनिटांत विकली गेली. आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या विराट आणि रोहितला फलंदाजी करताना पाहण्याची एकही संधी चाहत्यांना सोडायची नाहीये.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी जरी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ अजूनही कायम आहे. याच कारणामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याची सर्व तिकिटे फक्त 8 मिनिटांत ‘हातोहात’ विकली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत कोहली आणि रोहितच्या बॅटने चांगलीच फटकेबाजी केली होती.
विराटने तर तीन सामन्यांपैकी 2 सामन्यांत शतके आणि एका सामन्यात अर्धशतक झळकावून टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. दुसरीकडे, ‘हिटमॅन’ रोहितनेही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. याआधी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरही रोहित-कोहलीच्या जोडीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली होती.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बडोद्याच्या बीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. तर, दुसरा सामना 14 जानेवारीला राजकोटमध्ये होईल. मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. टी20 मालिकेची सुरुवात 21 जानेवारीला होईल आणि शेवटचा सामना 31 जानेवारीला खेळवला जाईल.
Comments are closed.