आरे कॉलनीत बेस्टची बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबईतील आरे कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. बेस्ट बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात सकाळी सुमारे 6.20 वाजता आरे कॉलनी गेट क्रमांक 5 जवळ आरे रोडवर एका बेकरीसमोर झाला.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बेस्टची बस विक्रोळी डेपोतून बोरीवली पूर्वेकडे जात होती, तर ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. त्यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाली. धडकेनंतर काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि पादचारी व स्थानिकांनी तात्काळ पोलिस व आपत्कालीन सेवांना माहिती दिली.
बेस्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले की सकाळी झालेल्या पावसामुळे रस्ता अतिशय निसरडा झाला होता. त्यामुळे बस आणि ट्रक दोन्हींचा ताबा सुटला आणि अपघात झाला. धडक एवढी भीषण होती की ट्रकचालक केबिनमध्येच अडकून पडला. माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि विशेष उपकरणांच्या मदतीने ट्रकचालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तात्काळ महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत ट्रकचालकाची ओळख केराजी पी. ठाकूर (वय 30, रहिवासी – गुजरात) अशी झाली आहे. या अपघातात ट्रकचालकाचा सहायक सुरेश परमार (वय 28) हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातात बसचालक मोहम्मद रफीक शेख (वय 48) यांना डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बस कंडक्टर रविंद्र पांडुरंग शेम्बडकर (वय 52) यांना किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून पावसामुळे रस्ता घसरडा असण्याबरोबरच इतर कोणतीही निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरला का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती बेस्टच्या प्रवक्त्यांनी दिली.
Comments are closed.