रोहित-विराट नसते तर हजारे करंडकाकडे कोणीच वळले नसते! वन डे क्रिकेटच्या भविष्याबाबत अश्विनला गंभीर चिंता

विजय हजारे ट्रॉफीला मिळालेली लोकप्रियता आणि ग्लॅमर हे फक्त आणि फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीमुळेच लाभल्याचे ठाम मत व्यक्त केलेय माजी दिग्गज फिरकीवीर रविचंद्रन अश्विनने. त्यामुळे त्यांच्यानंतर वन डे क्रिकेटचे काय होईल, अशी गंभीर चिंताही वर्तवली आहे.

बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धेत टीम इंडियातील खेळाडूंचा सहभाग बंधनकारक केल्यामुळे विजय हजारे करंडक स्पर्धेत टीम इंडियातील सारेच खेळाडू मैदानात उतरले होते. सर्वात विशेष म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सहभागामुळे हजारे करंडकाला अभूतपूर्व प्रसिद्धी लाभली. या स्पर्धेबाबत अश्विन आपल्या ‘यूटय़ूब’ चॅनलवर भरभरून बोलला. तो म्हणाला, रोहित आणि विराट विजय हजारे करंडकात परतले आणि लोकांनी ती पाहायला सुरुवात केली. खेळ हा नेहमीच व्यक्तींपेक्षा मोठा असतो, हे आपल्याला माहीत आहे. पण काही वेळा या खेळाडूंनाच खेळाला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी मैदानात उतरावे लागते. विजय हजारे ट्रॉफी ही अशी देशांतर्गत स्पर्धा आहे, जी सहसा फारशी कोणी फॉलो करत नाही. मात्र विराट आणि रोहित खेळत असल्यामुळे लोकांनी ती पाहिली. पण उद्या हे दोघे वन डे क्रिकेटमधून निवृत्त झाले, तर काय होणार?

2027 नंतर वन डेचे काय होणार

पुढच्या वर्षी वन डेचा वर्ल्ड कप आहे. या स्पर्धेनंतर वन डे क्रिकेटचे भवितव्य काय असेल, याबाबत मला खात्री नाही. थोडी काळजी वाटते. मी विजय हजारे ट्रॉफी पाहतोय, पण ज्या उत्साहाने मी एसएमएटी (सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी) पाहिली तसा ओढा या स्पर्धेकडे वाटत नाही. प्रेक्षकांना नेमके काय पाहायचे आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. कसोटी क्रिकेटसाठी अजूनही जागा आहे, पण वन डे क्रिकेटसाठी मला प्रामाणिकपणे वाटते की, त्याची जागा आता कमी होत चालली आहे. अश्विनच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटमध्ये वन डे फॉरमॅटच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून देशांतर्गत क्रिकेटच्या लोकप्रियतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Comments are closed.