ख्वाजाच्या निवृत्तीची वेळ आलीय, सिडनी कसोटीपूर्वी ख्वाजा कारकीर्दीबाबत मौन सोडणार

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा आता आपल्या कसोटी कारकीर्दीच्या निर्णायक वळणावर उभा आहे. इंग्लंडविरुद्ध सिडनीत होणाऱया पाचव्या आणि अखेरच्या ऍशेस कसोटीपूर्वी ख्वाजा आपल्या कसोटी निवृत्तीबाबत मौन सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ‘द ऑस्ट्रेलियन’च्या वृत्तानुसार, सिडनी कसोटीपूर्वी पत्रकार परिषद घेत ख्वाजा आपल्या पुढील वाटचालीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांतील कामगिरी ख्वाजासाठी चिंताजनक ठरली आहे. या काळात त्याची कसोटीतील सरासरी अनुक्रमे 25.93 आणि 36.11 इतकी घसरली आहे. 2025 मध्ये त्याने 18 डावांत 614 धावा केल्या असल्या तरी त्यात केवळ एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. हे एकमेव शतकही श्रीलंकेविरुद्ध जानेवारी-फेब्रुवारी 2025 च्या दौऱयात करण्यात आले. या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ख्वाजाने 232 धावांची खेळी साकारली होती.

सध्याच्या अॅशेस मालिकेत 39 वर्षीय ख्वाजाने सलामीवीर म्हणून सुरुवात केली, मात्र पर्थ कसोटीत पाठीत आकडी आल्याने तो दुसऱया डावात उतरू शकला नाही. ब्रिस्बेन कसोटीत तो पूर्णपणे बाहेर राहिला, तर ऍडलेडमध्ये सुरुवातीला संघाबाहेर होता. स्टीव्ह स्मिथ आजारी पडल्यामुळेच त्याला मधल्या फळीत पुन्हा संधी मिळाली. मेलबर्न कसोटीत त्याने दोन डावांत 29 आणि शून्य धावा केल्या.

पाचव्या अॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ ः स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमरून ग्रीन, ट्रव्हिस हेड, जॉश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन, मिशेल स्टार्क, जेक वेदराल्ड आणि ब्यू वेबस्टर.

Comments are closed.