आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा फिरकीवर विश्वास; कमिन्स, हेझलवूड आणि टीम डेव्हिड पुनरागमनाच्या मार्गावर
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱया आयसीसी पुरुष टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने गुरुवारी आपला 15 सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे सोपवण्यात आले असून, उपखंडातील खेळपट्टय़ांचा विचार करता निवड समितीने यावेळी फिरकी गोलंदाजीवर अधिक भर दिला आहे.
निवड प्रक्रियेत हॉबर्ट हरिकेन्सचा स्फोटक फलंदाज मिचेल ओवेनला संघात स्थान न मिळणे हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, 2021 मधील विजयी संघाच्या तुलनेत यंदा कोणत्याही डावखुऱया वेगवान गोलंदाजाला संघात संधी देण्यात आलेली नाही, ही बाबही चर्चेचा विषय ठरली आहे.
या वर्ल्ड कपमध्ये तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. फिरकीपटू मॅथ्यू कुहनमन, अष्टपैलू कूपर कोनोली आणि वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट यांचा प्राथमिक संघात समावेश करण्यात आला आहे. कूपर कोनोलीची निवड विशेष लक्षवेधी मानली जात असून त्याने मागील 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सहभाग घेतलेला नाही. संघात ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन यांसारखे अनुभवी अष्टपैलू खेळाडू असून, गोलंदाजी आघाडी पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ऍडम झम्पा आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यावर असणार आहे.
ऑस्ट्रेलियाला ‘ब’ गटात स्थान मिळाले असून या गटात श्रीलंका, झिम्बाब्वे, ओमान आणि आयर्लंड यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 11 फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श, झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, नॅथन एलिस, जॉश हेझलवूड, ट्रव्हिस हेड, जॉश इंग्लिस, मॅथ्यू कुहनमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस आणि ऍडम झम्पा.
Comments are closed.