मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेस, भाजपच्या ३३ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले

मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी ९५ माजी नगरसेवकांपैकी भाजपच्या २४ व काँग्रेसच्या ९ अशा ३३ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे. या सर्वांना उमेदवारी नाकारत नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांना पक्षाने तिकीट नाकरल्याने यावेळी घरी बसावे लागणार आहे. भाजपच्या माजी ६१ जागांपैकी तब्बल २४ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे. तर काँग्रेस पक्षाने त्यांच्या १२ माजी नगरसेवकांपैकी ९ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारत नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने या निवडणुकीत बहुतांश ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे. तिकीट न मिळाल्याने माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील गोल्डन नेस्ट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नवघर पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोल्डन नेस्ट परिसरातील जैन मंदिरासमोर सिद्धिविनायक सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि अन्य उमेदवारही उपस्थित होते. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी भाजप आमदार आणि अन्य उमेदवारांना वगळून अज्ञात पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक यंत्रणेच्या या पक्षपाती कारवाईवर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Comments are closed.