न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 15 तगडे खेळाडू ठरले; न खेळताच ऋषभ पंत OUT, कोणाकोणाला संधी
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे संघ : भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी येत्या काही दिवसांत भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडीआधी सर्वाधिक चर्चा होत आहे ती ऋषभ पंतच्या नावाची. निवडकर्ते पंतला संधी देणार की नाही, याकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. पंत सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला, तरी त्याच्या क्षमतेबाबत शंका घेण्याचे कारण नाही.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतने चार सामन्यांत एक अर्धशतक झळकावले आहे. तरीही मागील तब्बल 18 महिन्यांपासून त्याला एकही एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेतून जर त्याला वगळण्यात आले, तर हा निर्णय अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा अन्यायकारक आणि प्रश्नांकित ठरेल. अनुभवी खेळाडूला सातत्याने संधी न देता कामगिरीच्या आधारावरच बाहेर ठेवणे, हे भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरेल.
संपूर्ण वर्ष बेंचवरच! 2025 मध्ये एकही वनडे सामना खेळला नाही पंत
ऋषभ पंत याने 2025 मध्ये एकही वनडे सामना खेळलेला नाही. मात्र तो चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तसेच गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील संघात होता. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडला चौथ्या क्रमांकावर आजमावण्यात आले आणि तिन्ही सामन्यात पंतला संधी मिळाली नाही. 2018 मध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत पंत याने 31 वनडे सामने खेळले आहेत. 30 जून 2019 ते 14 जानेवारी 2020 या कालावधीत त्याने सलग 11 वनडे खेळले. त्यानंतर कोविडनंतर 26 मार्च 2021 ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान त्याने 15 वनडे सामने खेळले, ज्यात एक शतक, दोनदा 75 पेक्षा अधिक धावा आणि एक 85 धावांची खेळी केली. त्यानंतर त्याचा एक भीषण कार अपघात झाला.
अपघातानंतर फक्त एकाच वनडेत संधी….
2024 मध्ये पुनरागमनानंतर कोलंबोमध्ये त्याने फक्त एकच वनडे सामना खेळला. विजय हजारे ट्रॉफीतील चार सामन्यांत तो फक्त एका सामन्यात 70 धावा करू शकला. दुसरीकडे, ईशान किशनने झारखंडकडून कर्नाटकविरुद्ध पहिल्याच सामन्यात 14 षटकार ठोकून लक्ष वेधून घेतले. ध्रुव जुरेलने उत्तर प्रदेशकडून शतक झळकावले असून, तो मागील वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग होता.
विकेटकीपर म्हणून केएल राहुल पहिली पसंती…
15 सदस्यांच्या संघात तीन विकेटकीपर घेणे शक्य नाही. सध्या फलंदाज-विकेटकीपर म्हणून केएल राहुल हीच पहिली पसंती आहे. त्यामुळे पंत किंवा जुरेल यांच्यापैकी कोणाच्या जागी ईशान किशनला संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. देवदत्त पडिक्कल यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. त्याने 37 सामन्यांत 92 पेक्षा अधिक सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र कर्णधार शुभमन गिलची पुनरागमन, दुसऱ्या टोकाला रोहित शर्माची उपस्थिती आणि मागील वनडेत शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल संघात असताना पडिक्कलला संधी मिळणे कठीण दिसते.
गोलंदाजी विभागात टी-20 विश्वचषक लक्षात घेता जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याला वनडेतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांचा विचार केला जाऊ शकतो. मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबतही चर्चा सुरू आहे. फिरकीत रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ (India’s ODI Squad for New Zealand Series) –
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.