मुंबईत वर्षभरात दीड लाख घरांची विक्री; मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरीत 13,487 कोटींचा महसूल

मुंबईत शहर आणि उपनगरात घरांच्या किमती गगनाला भिडत असल्या तरी घर खरेदी जोरात असल्याचे दिसतेय. मुंबईत गेल्या वर्षभरात 1 लाख 50 हजार 254 मालमत्तांची नोंदणी झाली असून गेल्या 14 वर्षांचा नवा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात मुद्रांक शुल्कातून सरकारच्या तिजोरीत तब्बल 13 हजार 487 कोटी रुपये जमा झाले आहेत.
नाईट फ्रँकने केलेल्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात दीड लाख घरांची विक्री झाली आहे जी वार्षिक सहा टक्के वाढ दर्शवते. सर्वाधिक 15 हजार 501 मालमत्तांची विक्री मार्चमध्ये झाली. त्यापाठोपाठ डिसेंबरमध्ये 14 हजार 447 मालमत्तांची नोंदणी झाली. डिसेंबरमध्ये झालेल्या एकूण मालमत्तांच्या नोंदणीत 80 टक्के वाटा हा निवासी मालमत्तांचा होता. सर्वात कमी मालमत्तांची नोंदणी ऑगस्टमध्ये झाली. या महिन्यात केवळ 11 हजार 230 मालमत्तांची नोंदणी झाली.
500 ते हजार चौरस फुटाच्या घरांना मागणी
विक्री झालेल्या मालमत्तांमध्ये 500 ते एक हजार चौरस फुटाच्या घरांना सर्वाधिक म्हणजे 82 टक्के मागणी पाहायला मिळाली. 1 हजार ते 2 हजार चौरस फुटाच्या घरांची मागणी 15 टक्के तर 2 हजारपेक्षा जास्त चौरस फुटाच्या घरांना केवळ 3 टक्के मागणी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

Comments are closed.