ड्रोनमधून शस्त्रे आणि ड्रग्स सोडण्यात आले.
सीमावर्ती भागात पाकिस्तानचे कृत्य, बॅग हस्तगत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने ड्रोन्सच्या साहाय्याने शस्त्रे, स्फोटके आणि अंमली पदार्थ टाकण्याची घटना घडली आहे. हा प्रकार समजताच भारताच्या सेनेने सीमाभागात मोठ्या प्रमाणात शोधकार्य हाती घेतले आहे. शस्त्रे आणि अंमली पदार्थांनी भरलेली एक बॅग सैनिकांकडून हस्तगत करण्यात आली. गुरुवारी सकाळी पाकिस्तानातून एका ड्रोनने भारताच्या वायुक्षेत्रात प्रवेश केला आणि स्फोटके, शस्त्रे आणि अंमली पदार्थांच्या बॅगा खाली टाकल्या. ही साधने दहशतवाद्यांना मिळावीत या हेतूने टाकण्यात आली होती. ही माहिती कळताच भारतीय सेनेच्या तुकड्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील वनप्रदेशात शोध अधियान हाती घेतले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक त्यांना एक बॅग मिळाली. या बॅगेची तपासणी केली जात आहे. आणखी बॅगा टाकण्यात आल्या आहेत काय, याचाही शोध घेतला जात आहे. भारताच्या ड्रोन शोधणाऱ्या यंत्रणेने या ड्रोन्सची माहिती दिली होती. त्यानंतर त्वरित शोधकार्य हाती घेण्याचा आदेश दिला गेला.
दहशवाद्यांची नाही हालचाल
जम्मू-काश्मीर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर किंवा रेषेच्या आता भारतीय भागात आता कोणत्याही दहशतवादी संघटनेची हालचाल नाही, असे भारताच्या भूसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेना सतर्क असून तिला अर्धसैनिक दलांचेही सहकार्य मिळत आहे. सातत्याने सीमेवर लक्ष ठेवले जात असल्याने दहशतवाद्यांच्या हालचाली थंडावल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तथापि, पाकिस्तानकडून नेहमीच भारतात दहशतवादाला खतपाणी घालण्याचे प्रकार होत आहेत. त्यातीलच हा नवा प्रकार आहे, अशी माहिती देण्यात आली.
वाहनांची तपासणी
भारतीय सेनेने ही घटना गंभीरपणे घेऊन जम्मू-पठाणकोट मार्गावर पोलीस सुरक्षा वाढविली आहे. जम्मूहून जाणाऱ्या आणि जम्मूकडे पठाकोटहून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. भारतीय सेनेचे ‘रोमिओ फोर्स’ हे दल खाटेनर भागात मोठ्या प्रमाणात गस्त घालत असून त्याने येथील वनविभागाची तपासणी चालविली आहे. अनेक स्थानी धाडी घालण्यात आल्या असून दहशतवादी एका स्थानी एकत्र येऊ नयेत, अशी व्यवस्था करण्यात येत आहे .कठुआ, सांबा, जम्मू आणि उधमपूर या जिल्ह्यांमध्ये सैनिक तुकड्यांना सज्जस्थितीत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानकडून सीमाभागात हिंसाचार आणि भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. तथापि, कोणत्याही स्थितीला यशस्वीरित्या उत्तर देण्याची सज्जता आम्ही ठेवली आहे, असे सेनेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.