शिवसेना-मनसेच्या संयुक्त वचननाम्याचे प्रकाशन शिवसेना भवनात होणार, संजय राऊत यांनी दिली माहिती
शिवसेना-मनसे युतीने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची जय्यत तयारी केली असून प्रचारात ठाकरे बंधूंच्या धडाकेबाज सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा संयुक्त सभा घेणार आहेत. ठाकरे बंधूंच्या या जाहीर सभा संपूर्ण चित्र पालटणाऱ्या ठरणार असल्याने युतीचे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तत्पूर्वी, रविवार, 4 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना व मनसे युतीच्या संयुक्त वचननाम्याचे प्रकाशन होणार आहे. शिवसेना भवनामध्ये वचननाम्याचे प्रकाशन होईल, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजया राऊत यांनी दिली. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना-मनसे युतीचा संयुक्त वचननामा प्रकाशित करत असून त्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रदीर्घ चर्चा झाली. चार तारखेला शिवसेना भवनात वचननाम्याचे प्रकाशन आहे. त्यासाठी राज ठाकरे शिवसेना भवनात उपस्थित राहतील.
पत्रकार परिषद हॉटेल ब्ल्यू सीला आणि वचननाम्याचे प्रकाश शिवसेना भवनात का? असे विचारले असा राऊत म्हणाले, शिवसेना भवनासारखी दुसरी प्रेरणादायी जागा या महाराष्ट्रात आहे का? जेथे बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण केले, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्या जागेशिवाय दुसरी कोणती जागा आमच्यासमोर दिसत नाही. जिथे शिवसेना भवन आहे तिथे आता मनसेचा उमेदवार लढतोय, असेही राऊत यावेळी म्हणाले.
मराठी माणसात फूट पाडण्यासाठी सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करण्यात आले. पण राज ठाकरे हे अत्यंत ठाम राहिले की, मराठी माणसात यावेळी कोणती फूट पडू देणार नाही. उद्धव आणि राज ठाकरे यांचे जे ऐक्य आहे याच्यामुळे भाजप, मिंधे यांच्या पोटात गोळा आला आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले.
ठाकरे बंधूंचा झंझावात, सहा संयुक्त धडाकेबाज सभा; रविवारी शिवसेना-मनसे वचननामा
ते पुढे म्हणाले की, मुंबईत मराठीच महापौर होईल. पण भाजपने काय सुरू केले आहे, तर मुंबईचा महापौर हिंदू होईल. हे लफंगे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. या मुंबईतून हिंदुत्वाचा लढा बाळासाहेबांनी सुरू केला, पण ही मुंबई मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाजारांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले, पण शिवाजी महाराज मराठी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले, ते मराठी आहेत. आम्हाला हे हिंदुत्वाचे खूळ लावू नका. आमच्या नसानसात, रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे. पण मुंबईचा महापौर मराठी होईल. इथे ‘जय महाराष्ट्र’ चालणार, ‘जय श्रीराम’ आमच्या हृदयात आहे.
Comments are closed.