आयसीसीच्या नियोजनावर रविचंद्रन अश्विन नाराज; म्हणाला, “हा वर्ल्ड कप पाहायला कोणी जाणार नाही”

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 चे बिगुल पुढील महिन्यात, 7 फेब्रुवारीपासून वाजणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांनी आपापले स्क्वॉड जाहीर केले आहेत. एकीकडे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच, माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयसीसीच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनल ‘ऐश की बात’ या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “या वेळी टी20 वर्ल्ड कप पाहायला कोणीही जाणार नाही.” आयसीसीच्या शेड्यूल आणि ग्रुप सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याने काही सामने चाहत्यांचा रस कमी करणारे असल्याचे मत व्यक्त केले.

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये एकूण 20 संघ सहभागी होत असून, त्यांना 5 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारतीय संघ ग्रुप A मध्ये आहे. या गटात भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, नामीबिया आणि नेदरलँड्स यांचा समावेश आहे.

अश्विन म्हणाला, “भारत-अमेरिका किंवा भारत-नामीबिया यांसारखे सामने चाहत्यांना फारसे आकर्षित करत नाहीत. यामुळेच लोक या स्पर्धेपासून दूर जातील.” त्याने 1996, 1999 आणि 2003 च्या विश्वचषकाची आठवण काढत सांगितले की, त्या काळात विश्वचषक चार वर्षांतून एकदाच यायचा आणि त्याचे वेगळेच महत्त्व असायचे. “आम्ही शेड्यूल कार्ड जपून ठेवायचो, इतकी ती स्पर्धा खास वाटायची,” असे अश्विनने सांगितले.

त्याने पुढे म्हटले की, “जर सुरुवातीच्या फेरीत भारताची लढत इंग्लंड, श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघांशी झाली असती, तर स्पर्धेची रंगत पहिल्यापासूनच वाढली असती. पण आता सुपर-8 पर्यंत पोहोचेपर्यंत स्पर्धा थंड असेल.”

टी20 वर्ल्ड कपव्यतिरिक्त, अश्विनने वनडे क्रिकेटच्या भवितव्यावरही चिंता व्यक्त केली. त्याच्या मते, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर आयसीसीला या फॉरमॅटबाबत गंभीर विचार करावा लागेल. “चाहते आता टी20 कडे झुकत आहेत. कसोटी क्रिकेट अजूनही काही प्रमाणात लोकांना आवडते, पण वनडे क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात आहे,” असे स्पष्ट मत अश्विनने मांडले.

Comments are closed.