आर्थिक राजधानी मुंबई, सुसाट मुंबई! हे स्वप्नं, हा शब्द ठाकरेंचा; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे मुंबईतील उमेदवारांसमोर मुद्देसूद सादरीकरण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्तरित्या शिवसेना भवनात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या मुंबईतील उमेदवारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांसमोर मुद्देसूद सादरीकरण करत उमेदवारांना प्रचारासाठी एक दिशा दिली. यामुळे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह आणि जोश निर्माण झाला. ही आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
आता सगळे उमेदवार आहात १६ तारखेला परत जिंकून नगरसेवक बनून यायचं आहे. एक छान समीकरण आपलं जुळलेलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आपण एकत्र आलेलो आहोत. आपण काय ताकदीने लढा देतोय हे सर्वांना माहिती आहे. आपल्या समोरून साम, दाम, दंड, भेद हे सगळं काही वापरलं जात आहे. तन, मन, धन या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे. धन हे सगळं त्यांच्याकडे आहे. धन त्यांच्याकडे असल्याने अर्थात त्याचा वापर तर होणारच आहे. त्याचे कसं वाटप सुरू आहे, कुठे ताटं तर कुठे वाट्या आणि पैसे देताहेत. हे सगळं सुरू आहे. निवडणूक आयोग किती कोणाच्या बाजूने राहणार ही एक वेगळी कथा आहेच, असा हल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप, मिंधेंवर चढवला.
अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन येताहेत, धमक्या येताहेत, उमेदवारी मागे घ्या नाहीतर… असं करू, तसं करू आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांत होत आहे. अंबादास दानवे यांनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितल्या आहेत. पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते. ते रोज बोलतच आहेत की, आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. आणि निवडणूक आपण लढत आहोत ती जिंकण्यासाठी लढत आहोत. मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. जे मोठे विषय आहेत, हिंदुत्व असेल, मराठी असेल, मुंबईचं मुंबईपण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल हे सगळं ते दोघे हाताळणार आहेतच. हे सगळं होत असताना तुमच्या सगळ्यांच्या प्रचारफेऱ्या सुरू झालेल्या आहेत. तुमच्या कार्यालयांचे उद्घाटनं सुरू झालेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातील, तुम्ही कशासाठी उभे राहताय? अर्थात मुंबईचं मुंबईपण आहे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे, हे लढत आहोतच, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही दोघांनी १५-१६ गोष्टी काढलेल्या आहेत, ज्या तुम्ही आतापासून सुरू करू शकता की, ही आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. हे एक वर्कशॉप समजा, हा वचननामा नाही. तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आणि जिंकून आल्यानंतर आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला या गोष्टी करून दाखवायच्या आहेत, असे सांगत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांवरसमोर सादरीकरण केले.
मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच, खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास, सार्वजनिक आरोग्य, महापालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज, मुंबईकरांचा स्वाभिमान, प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना, ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, पादचारी रस्ता, फूटपाथ आणि मोकळ्या जागा, मुंबईकरांना मोकळा श्वास, आर्थिक राजधानी मुंबई सुसाट मुंबई, युवा मुंबई- युवा मुंबईकर, चॅटबॉटद्वारे प्रशासकीय सेवा, मुंबई महापालितर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल, अशा विविध मुद्यांवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सादरीकरण केले. उमेदवारांना मार्गदर्शन केले.
आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मांडलेले १५ मुद्दे पुढील प्रमाणे…
सविस्तर बातमी लवकरच…
Comments are closed.