न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रेयस अय्यरची एन्ट्री की एक्झिट? मोठी अपडेट समोर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे, ज्याचा पहिला सामना 11 जानेवारीला होईल. बीसीसीआयने (BCCI) अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या आगामी मालिकेतील सहभागाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता, त्यानंतर तो अजूनही पुनरागमन करू शकलेला नाही. आता त्याच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मोठे अपडेट मिळाले आहे. फिटनेस क्लिअरन्स मिळवण्यासाठी अय्यर लवकरच मैदानात उतरताना दिसेल आणि त्यानंतरच त्याच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
रिपोर्टनुसार, 31 वर्षीय फलंदाज शुक्रवारी ‘दोन मॅच सिम्युलेशन’ चाचणीतून जाईल, त्यानंतर दुसरी सिम्युलेशन चाचणी सोमवार, 5 जानेवारी रोजी होईल. या चाचण्यांनंतरच त्याच्या नावाचा विचार केला जाईल. अय्यर सध्या बेंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये असून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अय्यरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र, क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बरगडीला (Ribs) दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही अय्यरला बाहेर राहावे लागले होते.
श्रेयस अय्यरने भारतासाठी 14 कसोटी सामन्यांमध्ये 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने 73 वनडे सामन्यांमध्ये 47.81 च्या सरासरीने 2917 धावा केल्या आहेत. तर 51 टी20 सामन्यांमध्ये त्याने 30.66 च्या सरासरीने 1104 धावा आपल्या नावावर केल्या आहेत.
Comments are closed.