टीम इंडियासाठी वाईट बातमी! ‘हा’ धडाकेबाज फलंदाज जखमी, पुनरागमनासाठी लागणार इतका वेळ

भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणारा साई सुदर्शन गंभीररीत्या जखमी झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना सुदर्शनला ही दुखापत झाली असून, तो अनेक आठवड्यांसाठी मैदानाबाहेर जाऊ शकतो. सुदर्शनच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले आहे, ज्यामुळे त्याचे लवकर पुनरागमन होण्याचे संकेत खूप कमी दिसत आहेत. सुदर्शन (29 डिसेंबर) रोजी सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पोहोचला होता आणि त्याने आपल्या उजव्या बाजूच्या बरगडीत वेदना होत असल्याची तक्रार केली होती.

साई सुदर्शन मैदानावर डाईव्ह मारताना स्वतःला गंभीररीत्या जखमी करून बसला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुदर्शनच्या उजव्या बरगडीत फ्रॅक्चर झाले आहे. सुदर्शनला ही दुखापत (26 डिसेंबर) रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान झाली आहे. सुदर्शनला एक आठवड्यापूर्वी देखील त्रास जाणवला होता, जेव्हा फलंदाजीचा सराव करताना एक चेंडू याच जागी लागला होता.

असे असूनही त्याने स्पर्धेत खेळणे सुरूच ठेवले होते. सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये झालेल्या सीटी स्कॅनमध्ये सुदर्शनच्या बरगडीला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदर्शनला या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

सुदर्शनच्या या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सची चिंता देखील वाढली आहे. आयपीएलमध्ये सुदर्शन गुजरातकडून खेळताना दिसतो. गेल्या हंगामात त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. मात्र, जर सर्व काही ठीक राहिले, तर सुदर्शन आयपीएलपूर्वी तंदुरुस्त होईल. सुदर्शनने टीम इंडियाकडून आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले असून, यादरम्यान त्याने 27 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. सुदर्शनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत.

Comments are closed.