सोलापुरात राजकीय वादातून मनसे नेत्याची हत्या, शहरात तणावपूर्ण वातावरण

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक घटना घडली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख बाळासाहेब सरवदे यांची संध्याकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. गंभीर अवस्थेत त्यांना मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून परिसरात तणाव वाढला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या उमेदवार शीतल शिंदे आणि बाळासाहेब सरवदे यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून जोशी गल्ली परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीतील अनेक प्रभाग आधीपासूनच संवेदनशील असल्याचे मानले जात होते आणि या घटनेनंतर निवडणुकीचा रंग अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.