केकेआरचा खरा 'किंग' कोण? शाहरुख खान की जुही चावला, जाणून घ्या सविस्तर

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ सध्या बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमान याच्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल 2026 मध्ये खेळण्यापासून रोखण्याची मागणी जोर धरत आहे. याच मागणीदरम्यान वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्याबद्दलही चर्चा सुरू आहे, ज्याला लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

रहमानवर बोली लावल्यामुळे केकेआर फ्रँचायझी आणि त्याचे सह-मालक शाहरुख खान यांना टीकाकारांनी लक्ष्य केले आहे. पण शाहरुख खान हाच केकेआर संघाचा एकमेव मालक आहे का? नाईट रायडर्स संघात कोणाकोणाची भागीदारी आहे, ते येथे जाणून घ्या.

कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीमध्ये दोन मोठे गट मालक आहेत. संघाची 55 टक्के भागीदारी रेड चिलीज एंटरटेनमेंट ग्रुपकडे आहे, ज्याचे मालक शाहरुख खान आहेत. तर उर्वरित 45 टक्के भागीदारी मेहता ग्रुपकडे आहे, ज्याचे चेअरमन जय मेहता आहेत. जय मेहता हे बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री जुही चावला हिचे पती आहेत. म्हणूनच अनेकदा सामन्यांदरम्यान जुही चावला देखील आपल्या संघाला प्रोत्साहन देताना दिसते.

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. 2012 मध्ये संघाने पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले होते, जिथे त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच आयपीएल 2014 मध्ये केकेआर पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचली, जिथे त्यांच्यासमोर पंजाब किंग्सचे आव्हान होते. कोलकाता संघाने यावेळी 200 धावांचे लक्ष्य पूर्ण करत पंजाबचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले.

कोलकाता नाईट रायडर्स 2024 मध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून धुव्वा उडवला होता.

Comments are closed.