बीसीसीआयचं मोठं मन; श्रीलंकेच्या मदतीसाठी टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, पहा नेमकं प्रकरण
भारतीय संघाचा ऑगस्ट महिन्यातील श्रीलंका दौरा क्रिकेटपुरता मर्यादित न राहता माणूसकीचा संदेश देणारा ठरणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. मात्र, श्रीलंकेत नुकत्याच आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ एक विशेष टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यातून मिळणारा संपूर्ण निधी चक्रीवादळग्रस्त नागरिकांच्या मदत व पुनर्बांधणीसाठी वापरण्यात येणार आहे.
याबाबतची अधिकृत माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, “बीसीसीआयने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला, याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. हा अतिरिक्त टी20 सामना चक्रीवादळातील पीडितांच्या मदतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या सामन्यातून जमा होणारी रक्कम थेट पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी वापरली जाईल.”
शम्मी सिल्वा पुढे म्हणाले की, “डिसेंबर 2025 च्या अखेरीस निधी उभारण्यासाठी दोन टी20 सामने खेळण्याची तयारी बीसीसीआयने दर्शवली होती. मात्र, त्या काळात वेळेची कमतरता आणि प्रसारक उपलब्ध नसल्यामुळे हे सामने आयोजित करणे शक्य झाले नाही.”
दरम्यान, भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश संयुक्तपणे टी20 वर्ल्ड कप 2026 चे यजमान आहेत. ही बहुचर्चित स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे, जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर अंतिम सामना श्रीलंकेत खेळवण्यात येईल. अन्यथा, अंतिम लढत भारतात आयोजित केली जाईल.
याशिवाय, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आगामी एकदिवसीय आणि टी20 मालिकेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही संघांमधील एकदिवसीय सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी खेळवले जातील. तर टी20 मालिकेतील सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होणार आहेत.
एकीकडे क्रिकेटचे रोमांचक सामने, तर दुसरीकडे संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात भारतीय संघाचा हा दौरा क्रीडा विश्वात सकारात्मक संदेश देणारा ठरणार आहे.
Comments are closed.