शुभमन गिलच्या सामन्यात चाहत्यांना नो एंट्री; थेट प्रक्षेपणही नाही, जाणून घ्या कारण

विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने जसे आपले दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळले होते, तसाच अनुभव आता शुभमन गिललाही येणार आहे. शनिवारी जयपूरिया कॉलेजच्या मैदानावर सिक्कीमविरुद्ध होणारा पंजाबचा सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात शुभमन गिल पंजाबकडून मैदानात उतरणार असून, सुरक्षा आणि मैदानातील आसन व्यवस्थेअभावी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. पंजाब संघाचे पुढील दोन सामने 3 आणि 6 जानेवारी रोजी अनुक्रमे सिक्कीम आणि गोवा यांच्याविरुद्ध होणार आहेत. गोव्याविरुद्धचा सामना के. एल. सैनी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असून, सिक्कीमविरुद्धचा सामना मात्र कॉलेजच्या मैदानावरच होईल.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, कॉलेजमध्ये बाहेरील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. केवळ विद्यार्थी आणि कर्मचारी यांनाच मैदानात येण्याची परवानगी असेल. सुरक्षेच्या दृष्टीने मैदानात बाउन्सरही तैनात करण्यात येणार आहेत. सामना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच खेळवण्यात येणार आहे.

यापूर्वी रोहित शर्मा खेळत असलेल्या मुंबईच्या सामन्याचे मैदानही सुरक्षेच्या कारणामुळे बदलण्यात आले होते. कोहली आणि रोहितप्रमाणेच शुभमन गिलचा हा सामना देखील दूरचित्रवाणी किंवा लाइव्ह स्ट्रीमिंगवर दाखवला जाणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हा सामना थेट पाहता येणार नाही.

दरम्यान, शुभमन गिल आणि अर्शदीप सिंग हे शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत संघासोबत दाखल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार, खराब हवामानामुळे त्यांच्या विमानसेवेत विलंब झाला आहे. मात्र हवामान सुधारल्यास ते रात्री उशिरा संघात सामील होतील.

Comments are closed.