नवीन वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशबांधवांना शुभसंदेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नूतन वर्षाचा प्रारंभ झाला असून या वर्षात सर्वांच्या मनोकामना आणि त्यांनी नववर्षाच्या निमित्ताने केलेले निर्धार सुफळ संपूर्ण होवोत, असा शुभसंदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आपली ध्येये साध्य करण्यासाठी सर्वांनी निर्धाराने, योजनाबद्ध पद्धतीने, आत्मविश्वासपूर्वक आणि उद्देश स्वच्छ ठेवून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असा संदेश त्यांनी देशासाठी ‘एक्स’वर प्रसारित केला आहे.

नवीन वर्षात आपले सर्व संकल्प पूर्णत्वास जावोत. त्यासाठी आवश्यक असणारा निर्धार आपल्या सर्वांकडे आहे. इच्छाशक्ती आणि योजनापूर्वक केलेले प्रयत्न यांच्या आधारावर आपल्याला यश मिळणार आहे, असा संदेश देत त्यांनी एक संस्कृत श्लोकही प्रसारित केला आहे. आपण दृढनिश्चय केला आणि मनातून नकारात्मक भावना काढून टाकली, तसेच चित्त ध्येयपूर्तीवर एकाग्र केले, तर सुसंपन्नतेच्या मार्गावर तुमची वाटचाल वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही. आपली प्रत्येक सदिच्छा पूर्ण करण्याची क्षमता आपल्यात आहे, असेही त्यांनी संदेशात स्पष्ट केले.

नववर्षाच्या शुभेच्छा

हे नूतन वर्ष आपल्या सर्वांना शुभ जावो. या वर्षात आपल्याला उत्तम आरोग्य आणि वैभवाची प्राप्ती होवो. या वर्षात जगात शांतता नांदो आणि त्याची वाटचाल समृद्धीच्या दिशेने होवो. नववर्षारंभाच्या निमित्ताने मी माझ्या देशाच्या भल्यासाठी प्रार्थना करीत आहे, अशा शुभेच्छा त्यांनी आणखी एका संदेशात सर्वांना दिल्या.

जुन्याला नव्याशी जोडण्याचे धोरण

देशाला नववर्षाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन संस्कृत श्लोकाचा संदर्भ घेतला आहे. हा संदर्भ त्यांनी आधुनिक भारताच्या प्रगतीशी जोडला आहे. आपल्या देशाच्या गतकाळासंबंधी नकारात्मक विचार न करता किंवा गतकाळ न नकारता त्याला वर्तमानातील आशा-आकांक्षांशी जोडण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण त्यांनी या संदेशातही लोकांना स्पष्टपणे दर्शवून दिले आहे.

आणखी एका श्लोकाचा उल्लेख

आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एका संस्कृत श्लोकाचा आधार घेतला आहे. हा संदेश त्यांनी नववर्षाच्या प्रारंभीच्या दिवशी, अर्थात, गुरुवारी दिला होता. या श्लोकात आयुष्याच्या स्थूल उद्देशांविषयी भाष्य करण्यात आले आहे. आयुष्याच्या ध्येयांना आपण ज्ञान, संपत्ती, पराक्रम, सत्ता, सामर्थ्य, स्मरणशक्ती, स्वातंत्र्य, कौशल्य, बुद्धीमत्ता, धैर्यशीलता आणि विनयशीलता यांची जोड दिली पाहिजे. ती दिल्यास यश सुनिश्चित आहे, असा या संस्कृत श्लोकाचा संदेश आहे. या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे.

दोन दिवसांमध्ये दोन संदेश…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाचा संदेश सलग दोन दिवस दिला आहे. त्यांचे हे सर्व संदेश प्रोत्साहन आणि मार्गदर्शनपर असून या संदेशांमधून त्यांची संवेदनशीलता आणि देशासाठी त्यांच्या मनात असलेली निखळ आत्मियता स्पष्टपणे दिसून येते, अशी प्रतिक्रिया या संदेशांवर व्यक्त होत आहे.

Comments are closed.