पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपवर तुफान हल्लाबोल, म्हणाले, भाजपची राक्षसी भूक….

Pimpri Chinchwad Mahangarpalika Election 2026: माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे तुम्हाला माहिती असेल. पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे ना, असा बिनतोड युक्तिवाद करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या (BJP) नेत्यांना पेचात पकडले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजित पवारांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. (Ajit Pawar slams BJP over Pimpri Chinchwad Mahangarpalika Election 2026)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी सध्या कुठे भ्रष्टाचार करुन पैसे कमावता येतील, हेच एकमेव लक्ष्य आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कशाप्रकारे कर्जाच्या खाईत लोटली गेली, हे तुम्ही पाहिले असेल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 8000 कोटी रुपयांच्या ठेवी सत्ताधाऱ्यांनी मोडल्या. या ठेवी मोडून काय कामं केली असतील तर ती दाखवावीत. पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, सव्वा किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी 81 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. आम्ही कधी सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही. पण यांना सत्तेची मस्ती, नशा आणि माज आलाय, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भ्रष्टाचाराने पोखरण्यात आली. रस्ते, शिक्षण, कुत्र्यांची नसबंदी अशा सर्व प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. सत्ताधारी भाजपला शहराच्या विकासाचे व्हिजन नाही. माझं पिंपरी चिंचवडच्या जनतेला आवाहन आहे की, तुम्ही घड्याळ-तुतारीच्या युतीचे उमेदवार निवडून द्या. पिंपरी-चिंचवडमध्ये मी रोज पाण्याची व्यवस्था करेन. मी जे बोलतो, ते करतो, तेवढी धमक माझ्यात आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

Ajit Pawar: भाजपच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये हफ्तेखोरी, रिंग करुन पैसे लाटले: अजित पवार

मी  1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला. हवा तो विकास केला. मात्र, 2017 साली एक लाट होती. त्यावेळी विठ्ठल मूर्ती घोटाळा झाला. आता त्यावेळी ज्या महापौरांच्या काळात हे झालं, आज ते महापौर आमच्या विरोधात लढणाऱ्या (भाजप) पक्षात गेलेत. शरद पवारांनी पिंपरीत विकासाला गती दिली. 2017 पूर्वी पिंपरी पालिकेच्या 4844 कोटी आज या ठेवी 2000 कोटींवर आल्यात. मुळात या ठेवी वाढायला हव्या होत्या. इतकंच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी कर्ज रोखे काढून महानगपालिकेवर कोट्यवधी कर्ज केलं. भाजपच्या सत्ता काळात रिंग करुन पैसे लाटले गेले. रस्ते अरुंद केल्यानं वाहतूक कोंडी झाली. आमच्या काळात सुसाट प्रवास होत होता. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावलेली आहे. अनेक रस्त्यावर अतिक्रमण झालंय, तिथं हफ्तेखोरी सुरु असल्याचं दिसतं. गेल्या नऊ वर्षात भाजपच्या सत्ता काळात हा असला विकास झालाय. टेंडरमध्ये रिंग केली जाते, दादागिरी केली जाते. मी पुरावे देईन. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही, कोणावर बिनबुडाचे आरोप करणार नाही. ही राक्षसी भूक मला पाहवत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.