गुजरातमधील एक आयएएस अधिकारी ईडीच्या जाळ्यात अडकला आहे.

सुरेंद्रनगरच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांना अटक : 1,500 कोटींच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी कारवाई

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमधील 1,500 कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरेंद्रनगरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र पटेल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीची तीन पथके शुक्रवारी सकाळी गांधीनगर येथील राजेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. या छाप्यात त्यांची सुरुवातीला तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी 1 कोटींपर्यंतची रक्कम लाच स्वरुपात मिळवल्याचे स्पष्ट होताच संशयास्पद व्यवहार दिसून आल्याने ईडीच्या पथकाने आयएएस अधिकाऱ्यावर अटकेची कारवाई केली.

ईडीच्या पथकाने यापूर्वी 20 आणि 21 डिसेंबर रोजी सुरेंद्रनगर जिह्यात छापे टाकले होते. सुरेंद्रनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र पटेल यांच्या व्यतिरिक्त त्यांचे पीए जयराजसिंह झाला, उपतहसीलदार चंद्रसिंह मोरी आणि लिपिक मयुरसिंह गोहिल यांच्यावर छापे टाकण्यात आले होते. छापेमारीदरम्यान, मोरी यांच्या घरातून 60 लाख रुपयांहून अधिक किमतीची रोकड जप्त करण्यात आली होती. ही रोकड त्यांच्या बेडरुममध्ये लपवण्यात आली होती. पैसे जप्त झाल्यानंतर मोरी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर, 23 डिसेंबर रोजी पीएमएलएच्या कलम 17 अंतर्गत नोंदवलेल्या त्यांच्या जबाबात मोरी यांनी जप्त केलेली रोख रक्कम ही लाचेची रक्कम होती, जी थेट अर्जदारांकडून किंवा मध्यस्थांमार्फत घेतली गेली होती, अशी कबुली त्यांनी दिली होती.

सौराष्ट्र घरखेड भाडेपट्टा वसाहत आणि कृषी जमीन अध्यादेश, 1949 अंतर्गत सीएलयू (जमीन वापरात बदल) अर्जांची मालकी पडताळणी आणि प्रक्रिया करण्याचे काम उपतहसीलदार मोरी यांच्यावर सोपवण्यात आले होते. तथापि, मोरी यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला. थानच्या विड परिसरातील 3,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 3,600 बिघा जमिनीच्या फायली जलद मंजुरीसाठी अर्जदारांकडून लाच घेतल्याचा आरोप मोरी यांच्यावर ठेवण्यात आला होता. ईडीच्या तपासात या जमिनीच्या सर्वेक्षण क्रमांकात अनेक नावे जोडण्यात आल्याचे दिसून आले होते. सर्वेक्षणात नावे जोडण्यासाठी लाच घेतली जात होती. तपासात सर्वेक्षणात जोडलेली अनेक नावे उघड झाल्यानंतर ईडीने सुरेंद्रनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र पटेल यांच्या घरावरही छापा टाकला. जिल्हाधिकारी या जमिनीशी संबंधित फायली घरी घेऊन जायचे असे आढळून आले. त्यांच्या बंगल्यातून अशा 100 फायली जप्त करण्यात आल्या. राजेंद्र पटेल यांच्या नावावर 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे.

डॉ. राजेंद्र कुमार पटेल यांची कारकीर्द

2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र कुमार पटेल हे गुजरातमधील अहमदाबाद जिह्यातील रहिवासी आहेत. 23 ऑगस्ट 1985 रोजी जन्मलेले राजेंद्र कुमार 7 सप्टेंबर 2015 रोजी नागरी सेवेत रुजू झाले. राजेंद्र कुमार पटेल यांनी बीडीएस आणि सार्वजनिक धोरणात एम.ए. पदवी घेतली आहे. सरकारने 4 फेब्रुवारी 2025 रोजी पटेल यांची सुरेंद्रनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. या नियुक्तीनंतर त्यांच्या कक्षेत येणाऱ्या क्षेत्रात जमीन गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Comments are closed.