मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT…; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी
टीम इंडिया स्क्वॉड विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आज न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत प्लेयर ऑफ द सिरीज ठरलेला माजी कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करणारा विराट कोहलीची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. केएल राहुल संघाचा प्रमुख विकेटकीपर असेल, हेही जवळपास ठरलेले आहे. मात्र दुसऱ्या विकेटकीपरसाठी ऋषभ पंत आणि ईशान किशन यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळू शकते.
ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवणाऱ्या ईशान किशनला यावेळी दुहेरी भूमिका दिली जाऊ शकते. तो बॅकअप विकेटकीपरसोबतच बॅकअप ओपनर म्हणूनही टीम मॅनेजमेंटचा पसंतीचा पर्याय ठरू शकतो. गरज भासल्यास ईशान मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो, त्यामुळे तो केएल राहुलसाठी मजबूत बॅकअप पर्याय ठरतो. दुसरीकडे ऋषभ पंतसाठी वनडे संघात स्थान टिकवणे अवघड वाटत आहे. पंतने आपला शेवटचा वनडे सामना 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो सातत्याने संघाबाहेर-आत होत आहे. जरी पंतकडे X-फॅक्टर असला, तरी सध्याच्या फॉर्म आणि कॉम्बिनेशन पाहता त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.
कॉम्बिनेशनमुळे यशस्वी जैस्वाल बाहेर?
प्लेइंग-11 च्या कॉम्बिनेशनमुळे यशस्वी जैस्वालला बाहेर बसावे लागू शकते. शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाचा टॉप-3 जवळपास निश्चित मानला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितसोबत सलामी करणाऱ्या यशस्वीसाठी अंतिम संघात जागा मिळवणे कठीण होऊ शकते. टीम मॅनेजमेंटने बॅलन्सला प्राधान्य दिल्यास यशस्वीला केवळ प्लेइंग-11 नव्हे तर संपूर्ण स्क्वॉडमधूनही वगळले जाऊ शकते.
शमी–सिराजच्या पुनरागमनावर चर्चा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघात असलेला मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत बाहेर होता. मात्र हैदराबादसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्याचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी सिराजला संधी मिळू शकते. मोहम्मद शमीबाबतही निवड समितीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मार्च 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर त्याने बंगालकडून सातत्याने गोलंदाजी करत फिटनेस सिद्ध केली आहे.
बुमराह–हार्दिकला विश्रांती?
वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याला या वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. दोघेही सतत दुखापतींशी झुंज देत असल्याने टीम मॅनेजमेंट त्यांना ब्रेक देण्याच्या विचारात आहे. मात्र हे दोघे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध असतील.
शुभमन गिलच कर्णधार, श्रेयस अय्यरची निवड होणे अवघड
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मागील वनडे मालिका दुखापतीमुळे न खेळू शकलेला शुभमन गिल आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तोच संघाचे नेतृत्व करेल, असे जवळपास निश्चित मानले जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्यामुळे श्रेयस अय्यर गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो बेंगळुरू येथील NCA मध्ये रिहॅब करत आहे. अजूनही त्याला फिटनेस क्लिअरन्स मिळालेला नसल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड होणे अवघड आहे.
नंबर-4 साठी गायकवाड विरुद्ध तिलक
श्रेयसच्या अनुपस्थितीत नंबर-4 स्थानासाठी ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांच्यात स्पर्धा असू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गायकवाडने या स्थानावर शतक झळकावले होते, त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. बॅकअप म्हणून तिलक वर्मा स्क्वॉडमध्ये असू शकतो. मात्र वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला विश्रांती दिल्यास रियान परागला संधी मिळू शकते.
नीतीश रेड्डी फिनिशरची भूमिका बजावणार?
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत पेस बॉलिंग ऑलराउंडर नीतीश कुमार रेड्डीला फिनिशरची भूमिका दिली जाऊ शकते. मागील मालिकेत संधी न मिळाल्याने यावेळी निवडकर्ते त्याच्यावर विश्वास दाखवू शकतात. स्पिन ऑलराउंडरमध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची निवड जवळपास निश्चित आहे. कुलदीप यादव स्पिन विभागाचे नेतृत्व करू शकतो, तर वरुण चक्रवर्तीचा वनडे संघात समावेश होणे सध्या कठीण मानले जात आहे.
भारताचा संभाव्य संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), इशान किशन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.