दुर्दैवाने आमचे शेजारी वाईट आहेत: जयशंकर

वृत्तसंस्था/ .चेन्नई

शेजारी वाईटही अशू शकतात, दुर्दैवाने आमचे आहेत, जर एखादा देश जाणूनबुजून सातत्याने आणि कुठल्याही पश्चातापाशिवाय दहशतवाद जारी ठेवणार असेल तर आम्हाला आमच्या लोकांना दहशतवादापासून वाचविण्याचा अधिकार असल्याचे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत. विदेशमंत्र्यांनी आयआयटी मद्रासमध्ये एका कार्यक्रमाला शुक्रवारी संबोधित केले.

दहशतवादविरोधातील आमचा अधिकार कशाप्रकारे वापरावा हे आमच्यावर निर्भर आहे. आम्ही काय करावे आणि काय करू नये हे कुणी आम्हाला सांगू शकत नाही. आम्ही स्वत:च्या बचावासाठी जे काही करावे लागेल ते करणार आहोत असे जयशंकर म्हणाले.

चांगले लोक नुकसानदायक नाहीत

मी दोन दिवसांपूर्वी बांगलादेशात होतो. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा जिया यांच्या अंत्यसंस्कारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी गेलो होतो. आम्हाला अनेक प्रकारचे शेजारी मिळाले आहेत. जर तुमचा एखादा शेजारी तुमच्यासाठी चांगला असेल किंवा कमीतकमी तुमच्यासाठी नुकसानदायक नसेल तर त्यात त्रासत नाही. जेथे कुठे चांगला शेजारी होण्याची भावना असते, भारत गुंतवणूक करतो, भारत मदत करतो असे वक्तव्य जशयंकर यांनी केले आहे.

पाश्चिमात्यांसोबत भागीदारी

पाश्चिमात्य देशांसोबत भागीदारी आवश्यक आहे आणि ही भागीदारी सकारात्मक पद्धतीनेच केली जाऊ शकते. ‘वसुधैव कुटुंबकम’चा अर्थ भारताने जगाला कधीच शत्रू किंवा धोक्याच्या स्वरुपात पाहिले नाही. मर्यादित साधनसामग्री  असतानाही अधिक प्रभाव कसा पाडता येईल हीच भारताच्या विदेश धोरणाची विचारसरणी आहे. भारतीय कूटनीति स्वत:ची शक्ती, प्रतिस्पर्धा आणि जागतिक संस्थांचा वापर करून उपाय शोधत असल्याचे वक्तव्य जयशंकर यांनी केले आहे.

पुरवठासाखळीचा विकास

व्हॅक्सिन डिप्लोमसीचा भावनात्मक प्रभाव अत्यंत खोलवर राहिला. अनेक देशामंध्ये पहिली व्हॅक्सिन खेप मिळाल्यावर लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. कोविडदरम्यान अनेक विकसित देशांनी गरजेपेक्षा अधिक लसीचा साठा जमविला होता. छोट्या आणि गरीब देशांसाठी भारताची व्हॅक्सिन मदत ‘जीवनरेषे’सारखी होती. भारत जगासाठी सर्वात कुशल व्हॅक्सिन उत्पादकांपैकी एक आहे. जागतिक पुरवठासाखळी भारताच्या बाहेरून येते, याचमुळे जगासोबत सहकार्य आवश्यक असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.

अरुणाचल भारताचा हिस्सा

अरुणाचल प्रदेश भारताचा हिस्सा आहे आणि कायम राहणार आहे. कुठल्याही प्रकारच्या डावांनी वस्तुस्थिती बदलणार नाही. शांघाय विमानतळावर चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अरुणाचल प्रदेशच्या एका महिलेला देण्यात आलेल्या त्रासाप्रकरणी  जयशंकर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. आम्ही या घटनेचा विरोध केला, अशाप्रकारच्या कृत्यामुळे प्रत्यक्षात काहीच बदलणार नसल्याचे स्पष्टही केल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

भारताला स्वत:च्या इतिहासाची जाणीव

भारत जगातील अशा जुन्या संस्कृतींपैकी एक आहे, जी आजही एक आधुनिक राष्ट्राच्या स्वरुपात अस्तित्वात आहे. भारताला स्वत:चा इतिहास आणि वारशाची स्पष्ट जाणीव आहे, जी अत्यंत कमी देशांमध्ये पहायला मिळते. भारताने जाणूनबुजून लोकशाहीवादी व्यवस्थेला अवलंबिले, ज्यामुळे लोकशाही एक जागतिक राजनयिक विचार ठरला. स्वत:चे विचार, संस्कृती आणि इतिहास जगासमोर ठेवण्याची भारताची जबाबदारी असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

 

Comments are closed.