क्रिकेटनामा – विराटची विराट खेळी!
>> संजय कऱ्हाडे
दंगलग्रस्त परिसरात एखाद्या जाँबाज पोलीस अधिकाऱयाने पाठीमागे हात बांधून हलकीशी शीळ घालत परिस्थिती नियंत्रणात ठेवताना आपला रुबाब दाखवावा तसा विराटने त्याचा दरारा काल दाखवला! त्याच्या फलंदाजीत निखालस सहजता होती. नदीकाठी डुलत ठुमकत हिंडणाऱया हंसाने सोप्यात पाण्यात उतरावं इतकी सहजता! रोहित बाद झाल्यानंतर मैदानावर पाऊल ठेवताक्षणी विराटने याच सहजतेने जेमीसनला सरळ ड्राईव्ह मारला होता. पण जेमीसनलाच ड्राईव्ह करण्याच्या नादात हवेत गेलेला चेंडू ब्रेसवेलने झेलला आणि तो बाद झाला. मात्र सामन्याचाच नाही सर्वांच्याच दिलाचा मानकरी तो ठरला.
विराट बाद झाला आणि आपल्या संघाचा जीव कुणामध्ये दडलाय याची कल्पना गंपू गंभीरला नव्याने आली असेल. पाठोपाठ जाडेजा आणि श्रेयस बाद झाले. तोपर्यंत त्याने छान फलंदाजी केली होती खरी, पण जीव पंठाशी आलाच! 2 बाद 234 वरून 5 बाद 242. जेमिसनच्या खिशात चार विकेट! हर्षितच्या हाराकिरीनंतर राहुलने मात्र आपला अनुभव पणाला लावत आपल्या विजयावर ठप्पा मारला. बऱयाच काळानंतर शुभमनच्या धावा दिसल्या, पण त्यात लय नव्हती. पुन्हा एकदा तो ऑफ ड्राईव्हला नादावला, बाद झाला.
न्यूझीलंडची कामगिरी अतिशय व्यावसायिक किंवा व्यवहार्य होती. वीस षटकांत नाबाद 104. चाळीस षटकांत 5 बाद 212 अन् पन्नास षटकांत 8 बाद 300. न्यूझीलंडचा हा संघ एकूणच नवखा आहे. विल्यमसन, सँटनर, रचिन रविंद्रसारखे संघात नसताना त्यांची कामगिरी काwतुकास्पद म्हणावी लागेल. याचं श्रेय सलामीच्या निकल्स आणि कॉन्वेला देणं आवश्यक. त्यांच्याच शतकी भागीदारीच्या जोरावर डॅरिल मिचेलने तीनशेचा डोलारा मांडला. एकाहत्तर चेंडूंत त्याने फटकावलेल्या 84 धावा संयम अन् आक्रमकतेचं उदाहरण होतं. अर्थात, त्यानेच सोडलेल्या हर्षितच्या झेलाने आपला विजय सोपा केला.
आपल्या गोलंदाजांनी डावाच्या मध्यात अधूनमधून बळी मिळवले. पण एकूण गोलंदाजीत धार होती असं म्हणता येणार नाही. वन डेत पुनरागमन करणारा सिराज, प्रसिध किंवा हर्षित दिशा-टप्प्यात चुकले म्हणता येणार नाही. पण फारसे परिणामकारकही वाटले नाहीत. त्यात भर, कुलदीपने हर्षितच्या गोलंदाजीवर निकल्सचा सोडलेला झेल तर काळजाचा ठोकाच चुकवून गेला. माझ्याच नव्हे तर हर्षित आणि कप्तान गिलच्या काळजाचासुद्धा!
कप्तान गिलचाही झेल ग्लेन फिलिप्सच्या हातून सुटला. पण त्याने अफलातून झेप घेतल्यामुळे त्याला झेल म्हटलं गेलं! फिलिप्स उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. तो झेल त्याच्या डावीकडे दीड मीटर दूर होता, टप्प्यावर जोरदार स्क्वेअर ड्राईव्ह केलेला होता!
टी-ट्वेंटी विश्वचषक समोर दिसत असताना आपल्या क्षेत्रक्षणात लवकरात लवकर सुधारणा दिसायला हवी!
विराट धावांची मशीन! त्याच्यासारखी भूक कुणात पाहिली नाही – अॅलन डोनाल्ड
Comments are closed.