भारत-बांगलादेश वादात पाकची एन्ट्री, पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी ICCकडे थेट प्रस्ताव, नेमकं का

बांगलादेश T20 विश्वचषक यजमानपदासाठी पाकिस्तानने आयसीसीशी संपर्क साधला भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात पाकिस्तानचीही एन्ट्री झाली आहे. अलीकडच्या काळात भारत–बांगलादेश संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. या वादाची ठिणगी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 दरम्यान उडाली, जेव्हा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमान याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाकडून रिलीज करण्यात आले.

केकेआरने आयपीएल 2026 च्या लिलावात मुस्ताफिजुर रहमानला तब्बल 9.20 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निर्देशानुसार केकेआरने त्याला संघातून मुक्त केले. या निर्णयानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) तीव्र प्रतिक्रिया दिली. बीसीबीने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकातील आपले सामने भारताऐवजी अन्य ठिकाणी हलवावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली.

टी20 विश्वचषक 2026 च्या लीग टप्प्यात बांग्लादेशचे चार सामने भारतात होणार आहेत. यामध्ये तीन सामने कोलकात्यात तर एक सामना मुंबईत नियोजित आहे. मात्र बीसीबीच्या या मागणीला आयसीसीने स्पष्ट नकार दिला आहे. तरीही बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम असून, सुरक्षा कारणास्तव बांगलादेशी खेळाडूंना भारतात पाठवणार नसल्याचा दावा करत आहे. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीसमोर प्रस्ताव ठेवला आहे की, टी20 विश्वचषकातील बांग्लादेशचे सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यास ते तयार आहेत. मात्र आयसीसी पाकिस्तानचा हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता फारच कमी मानली जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, आयसीसी टी20 विश्वचषक 2026 चे यजमानपद संयुक्तपणे भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. पाकिस्तानने याआधीच आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसारच संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे बांगलादेशने अखेरच्या क्षणी केलेली वेन्यू बदलण्याची मागणी मान्य करणे जवळपास अशक्य आहे. कारण वेळापत्रकानुसार हॉटेल बुकिंग, प्रवासाची तिकिटे आणि इतर व्यवस्थांची आखणी आधीच पूर्ण झाली आहे.

मुस्ताफिजुर रहमानला आयपीएलमधून का रिलीज करण्यात आले?

भारत आणि बांगलादेशमधील या वादाचे मुख्य कारण मुस्ताफिजुर रहमान ठरले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, लिलावात खरेदी केल्यानंतर केकेआरने त्याला का रिलीज केले? यामागचे कारण असे की, अलीकडच्या काळात बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुस्ताफिजुर रहमानचाही मुद्दा पुढे आला आणि आयपीएलमध्ये बांग्लादेशी खेळाडूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली. या दबावामुळे अखेर बीसीसीआयने मुस्ताफिजुर रहमानला आयपीएलमधून रिलीज करण्याचा आदेश दिला, आणि त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला.

हे ही वाचा –

WPL 2026 Points Table : गुजरात टेबल टॉपर, मुंबई इंडियन्सची मोठी घसरण, रोमांचक सामन्यानंतर WPL Points Table मध्ये उलथापालथ

आणखी वाचा

Comments are closed.