गोल्डन ग्लोब्स 2026: लिओनार्डो डिकॅप्रियोच्या डेटिंग लाईफवर विनोद; निक्की ग्लेझरच्या जोकवर अभिनेता खुदकन हसला – Tezzbuzz

कॉमेडियन आणि होस्ट निक्की ग्लेझर यांनी रविवारी झालेल्या 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. सलग दुसऱ्या वर्षी शोचं सूत्रसंचालन करत असलेल्या निक्कीने आपल्या बेधडक, टोचून बोलणाऱ्या आणि कोणतीही भीड न ठेवणाऱ्या ओपनिंग मोनोलॉगने संपूर्ण हॉल हास्यकल्लोळात बुडवून टाकला. सेलिब्रिटींनी भरलेल्या या कार्यक्रमात त्यांनी केवळ हॉलीवूडमधील मोठ्या स्टार्सवरच नाही, तर वर्षभर गाजलेल्या चर्चित घटनांवरही आपल्या खास शैलीत मिश्कील भाष्य केलं.

लिओनार्डोला केलं ट्रोल -आपल्या दुसऱ्या टर्मचा उल्लेख करताना निक्कीने सुरुवातीलाच जोरदार पंचलाइन मारली. त्या म्हणाल्या,‘विकेड’प्रमाणेच मीही सीक्वेलसाठी परत आले आहे. आणि अगदी फ्रँकनस्टाईनसारखीच, मला एका परवाना नसलेल्या युरोपियन सर्जनने पुन्हा जोडून दिलं आहे.”या वाक्यावर संपूर्ण हॉल टाळ्यानी दुमदुमून गेला.

मोनोलॉगमधील सगळ्यात गाजलेल्या आणि धारदार विनोदांपैकी एक लिओनार्डो डिकॅप्रियोच्या डेटिंग हिस्ट्रीवर होता. निक्की म्हणाल्या, “लिओनार्डो डिकॅप्रियोचा (Leonardo DiCaprio)करिअर खरंच कमाल आहे. अनेक आयकॉनिक भूमिका, प्रत्येक मोठ्या दिग्दर्शकासोबत काम, तीन गोल्डन ग्लोब्स आणि एक ऑस्कर… आणि सगळ्यात प्रभावी गोष्ट म्हणजे, हे सगळं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडच्या 30 व्या वाढदिवसाआधीच मिळवलंत.”

या विनोदावर प्रेक्षकांची हसू थांबायचं नाव घेत नव्हतं. त्यानंतर निक्कीने गंमतीशीर पद्धतीने माफीही मागितली. त्या म्हणाल्या, “लिओ, मला माफ कर. हा विनोद थोडा स्वस्ता होता. मी टाळायचा प्रयत्न केला, पण खरं सांगायचं तर आमच्याकडे तुझ्याबद्दल याशिवाय दुसरं काहीच नाही. काहीतरी नवीन दे!
यावर लिओनार्डो हसताना दिसला. त्याने मान हलवत निक्कीला थम्स अपही दिला.

निक्कीने या वर्षातील बेस्ट अ‍ॅक्टर विजेता टिमोथी शालामेचंही कौतुक केलं. त्या म्हणाल्या,
“तो इतिहासातील पहिला अभिनेता आहे, ज्याला पिंग-पोंगवर आधारित चित्रपटासाठी मसल्स तयार करावे लागले.”तसंच ‘सिनर्स’ चित्रपटासाठी मायकेल बी. जॉर्डनचंही त्यांनी भरभरून कौतुक केलं. त्या म्हणाल्या,
“‘सिनर्स’मध्ये मायकेलने दोन भावांची भूमिका केली आहे… मी असं म्हणू शकते ना? म्हणजे, जुळ्या भावांची भूमिका. विश्वास बसत नाही, आपल्याला दोन मायकेल बी. जॉर्डन मिळाले!”हे ऐकून आपल्या आईजवळ बसलेला मायकेल स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही.

मोनोलॉगमध्ये निक्कीने या वर्षातील काही मोठ्या हॉलीवूड वादांचाही उल्लेख केला. एपस्टीन फाइल्स आणि इंडस्ट्री डील्सवर भाष्य करताना त्यांनी नेटफ्लिक्स आणि वॉर्नर ब्रदर्सच्या डीलवर टोला लगावला.
“चला, आता खऱ्या कामाला लागूया. वॉर्नर ब्रदर्सची बोली आपण 5 डॉलरपासून सुरू करूया. कुणी 5 डॉलर म्हणणार आहे का?”असं म्हणत त्यांनी हशा पिकवला. एपस्टीन फाइल्सचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की या हॉलमध्ये असे अनेक ए-लिस्टर्स आहेत, ज्यांची नावं एका प्रचंड एडिट केलेल्या यादीत आहेत.

निक्कीने शॉन पेनला “सेक्सी लेदर हँडबॅग” असं संबोधलं, तर केविन हार्ट आणि ड्वेन जॉन्सन या जोडीला “50 पेक्षा कमी IQ असणाऱ्यांसाठी स्टीव्ह मार्टिन आणि मार्टिन शॉर्ट” असं म्हटलं.

उल्लेखनीय म्हणजे, निक्की ग्लेझर यांनी मागील वर्षी गोल्डन ग्लोब्समध्ये पहिल्यांदाच होस्ट म्हणून पदार्पण केलं होतं. त्यांच्या बेधडक होस्टिंग आणि शार्प ह्युमरमुळे त्यांना थेट 2026 एडिशनसाठी पुन्हा संधी देण्यात आली. यंदाही त्यांनी सिद्ध केलं की आज त्या हॉलीवूडमधील सगळ्यात निडर आणि चर्चित कॉमेडियन्सपैकी एक का आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

भीतीची परिसीमा गाठणारी वेब सीरिज; एपिसोडपाहून उडेल झोप – पाहण्याआधीच पाठ करा हनुमान चालीसा,
IMDb वर अप्रतिम रेटिंग

Comments are closed.