बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातला बाण चोरणारे अमित शहा व मिंधे राजकारणात टिकणार नाहीत, संजय राऊत यांचा घणाघात

”बाळासाहेबांचं पुण्य फार मोठं आहे. त्यांच्या देव्हाऱ्यातला बाण ज्यांनी कुणी चोरला ते अमित शहा आणि हा मिंधे हे दोघे देखील राजकारणात टिकणार नाही”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना त्यांनी मिंधे गट व भाजपचा खरपूस समाचार घेतला.

”ठाण्यातली ही लढाई निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी आहे. ठाण्यात बाळासाहेबांनी निष्ठेचं बिज पेरलं ते आज मला जसंच्या तसं दिसतंय. आतापर्यंतची सर्वात विराट सभा शिवतीर्थावर झाली. त्या सभेत उद्धव साहेब व राज साहेबांनी जे तडाखे दिले त्या तडाख्यातून मिंधे फडणवीस अद्याप सावरले नाहीत. या ठाण्याला एक वेगळं महत्त्व आहे. मुंबईच्या आधी बाळासाहेबांना कुणी सत्ता दिली ती या ठाण्याने दिली. काही लोकं सांगतात की फडणवीसांनी ठाण्यात शंभर सभा घेतल्या, मिंधे ठाण्यात हेलिकॉप्टरने फिरतात. तुमची फक्त एकच सभा होतेय. मला त्यांना सांगायचं आहे की ठाकरे बंधूंना सतराशे साठ सभा घ्यायची गरज नाही. सौ सोनार की दो लोहार की. ठाणेकर तुमच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. महाराष्ट्राला दाखवायचं आहे लोकसभा विधानसभेला कसे घोटाळे करून विजय प्राप्त केला. ठाण्याच्या महापालिकेवर ठाकरे बंधूंचा भगवा फडकवायची जबाबदारी ठाकरे बंधूंवर आहे.

”राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना कुणीतरी सांगायला हवं या राज्याची भाषा मराठी आहे. दोन दिवसांपूर्वी ते वसई विरारला गेले होते. तिथे फडणवीसांनी हिंदीत भाषण केलं. का तुम्ही तिथे हिंदीत भाषण केलं. वसई विरार हा देखील मराठी भाषिक भाग आहे. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राचा एक एक भाग, मुंबईच्या आसपासचा भाग हा कुणालातरी आंदन देताय. ही लढाई जशी मराठी माणसाची, मराठी भाषेची आहे तशीच महाराष्ट्राच्या अखंडतेची देखील आहे” असे संजय राऊत म्हणाले.

” खरंतर आजच्या सभेचं अध्यक्षस्थान गणेश नाईकांना द्यायला हवं होतं. त्यांना आमंत्रित करायला हवं होतं. भाजपचे मंत्री गणेश नाईक ज्या प्रकारे बेईमानांच्या खुर्चीखाली फटाके फोडतायत त्याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे. ते म्हणतात की पक्षश्रेष्टींनी परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून त्यांचे घोडे फरार करतील. माझे गणेश नाईकांना आव्हान आहे की तुम्ही नवी मुंबईत त्यांचा टांगा पलटी करा उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबई ठाण्यात त्यांचा टांगा पलटी करतील”, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

”गणेश नाईक बोलतात की नवी मुंबईत हरामाचा पैसा वाटला जातोय. हरामखोर हरामाचाच पैसा वाटणार. गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे की हरामाचा म्हणजे नक्की कुठला पैसा, महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. हा पैसा या हरामखोरांकडे येतो कुठून. संपूर्ण महाराष्ट्रात हरामाचं राज्य सुरू आहे. हरिश्चंद्राचं राज्य यांनी उलथवून टाकलं. या राज्याचा एक मंत्री ठाण्याच्या पालकमंत्र्याचा रोज वस्त्रहरण करतोय आणि या राज्याचे मुख्यमंत्री मजा बघतायत. ठाणेकरांना मजा बघता येणार नाही. त्यांना आपला हक्क बजावावा लागणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

”अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणतात की भाजप हा राक्षस आहे. भाजपला सत्तेचा माज आणि नशा आली आहे. हा माज उतरवायला उद्धव आणि राज आहेत. माज उतरवण्याचं औषध उद्धव आणि राज यांच्याकडे आहे”, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

”बाळासाहेबांचं पुण्य फार मोठं आहे. त्यांच्या देव्हाऱ्यातला बाण ज्यांनी कुणी चोरला ते अमित शहा ही राजकारणात टिकणार नाही आणि हा मिंधे देखील राजकारणात टिकणार नाही. हे ठाणे आहे हे लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. इथे कोणत्याही गद्दारीला स्थान मिळणार नाही. आज जे गद्दार सत्तेत आहेत त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही मुंबई महापालिकेवरून आमच्यावर आरोप करता ना मग ठाण्याची महापालिका खड्ड्यात कुणी घातली? सगळ्यात जास्त टेंडरबाजी कुठे झाली असेल तर तरी या ठाण्यात झाली आहे. त्याला जबाबदार ही माफियांची आणि गुंडांची टोळी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

”परवा हे मिंधे महाशय संभाजीनगरला होते. आता पर्यंत ते कायम बोलत आले की माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. त्यांचं कालचं भाषण ऐका 2022 साली आम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या सरकारचं तख्तपालट केलं असं ते म्हणाले. याला टांग्याची फार आवड आहे. आपलं सरकार आलं की याचा टांगा पलटवून लावायचा. यांच्या जिभा झडत कशा नाहीत असे वक्तव्य करताना”, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Comments are closed.