VHT 2026: विराट-रोहितला जे जमलं नाही, तिथे पडिक्कलने मारली बाजी! असा विक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
डावखुऱ्या हाताचा फलंदाज देवदत्त पडिक्कल भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. सध्या तो विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटक संघाकडून खेळताना दिसून येत आहे. या संघाकडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. या स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात त्याने मुंबईविरूद्ध फलंदाजी करताना 81 धावांची खेळी केली. यासह त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील या हंगामात 700 धावांचा पल्ला गाठला आहे. यासह तो विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एकापेक्षा अधिक वेळेस 700 हून अधिक धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. देवदत्त पडिक्कलने 2 वेळा एकाच हंगामात 700 हून अधिक धावा केल्या आहेत. असा पराक्रम इतर कुठल्याही फलंदाजाला करता आलेला नाही.
विजय हजारे ट्रॉफीतील क्वार्टरफायनलच्या सामन्यात मुंबई आणि कर्नाटक हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी देवदत्त पडिक्कलला 700 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 60 धावांची गरज होती. या सामन्यात फलंदाजी करताना 24 व्या षटकात शम्स मुलानीच्या गोलंदाजीवर त्याने 1 धाव घेवून त्याने 700 धावांचा पल्ला गाठला. या हंगामात फलंदाजी करताना त्याने आतापर्यंत 4 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत.
विजय हजारे ट्रॉफीत आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला एकाहून अधिक हंगामात 200 हून अधिक धावा करता आल्या नव्हत्या. याआधी 2020-21 मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफी हंगामातही त्याने 700 धावांचा पल्ला गाठला होता. या हंगामात त्याने 737 धावांचा पल्ला गाठला होता. या स्पर्धेत आणखी 17 धावा करताच त्याने तो आपल्या वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडून काढू शकतो.
विजय हजारे ट्रॉफीत एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनच्या नावे आहे. त्याने 2022-23 हंगामात फलंदाजी करताना 830 धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढण्यासाठी देवदत्त पडिक्कलला आणखी 100 हून अधिक धावा कराव्या लागतील. देवदत्त पडिक्कलने या हंगामाची सुरूवात 118 चेंडूत 147 धावांची दमदार खेळी करून केली होती. ही खेळी त्याने झारखंडविरूद्ध खेळताना केली होती. या खेळीच्या बळावर कर्नाटक संघाने 413 धावांचा डोंगर सर केला होता.
Comments are closed.